माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीत मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवार देणार असल्याच्या चर्चा झाल्या. अनेक ठिकाणी सकल मराठा समाज कामाला लागला.
त्यामुळे मतदान बॅलेट पेपर होणार का, असा प्रश्नही निर्माण झाला. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत बोलावलेल्या बैठकीकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.
लोकसभेला एका मतदारसंघात शेकडो मराठा उमेदवार उभे केल्यास मत फुटतील. त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार द्या आणि त्याच्या मागे संपूर्ण ताकद उभी करा, असा पर्याय जरांगे पाटलांनी सुचवला.
लोकसभा निवडणुकीला जास्त अर्ज दाखल झाल्यास आपला समाज अडचणीत येऊ शकतो. आपली उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. जास्त उमेदवार असल्यास मतं फुटतील. त्यापेक्षा एका
मतदारसंघातून एका व्यक्तीची निवड करा. तो अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करेल. कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा निर्णय तुम्ही घ्या. ते मी सांगणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.आतापर्यंत
अनेक खासदार दिल्लीला गेले. पण त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. आपला प्रश्न दिल्लीतला नाही. तो राज्यातला आहे. मराठा समाजानं कोणत्याही सभेला जाऊ नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही.
पण मतदान १०० टक्के करा. त्यामुळे एकमतानं प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करू. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्या. तु्म्ही ज्याला उमेदवारी देऊ इच्छिता, तो सगळ्यांना मान्य आहे का,
याबद्दल चर्चा करा. त्याची माहिती मला लेखी द्या. त्यानंतर आपण उमेदवारांची घोषणा करू, अशी योजना त्यांनी सांगितली.राजकारण हा माझा मार्ग नाही. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात मी उतरणार नाही, असं मनोज जरांगे
पाटलांनी स्पष्ट केलं. मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल करायचा निर्णय अडचणीचा ठरू शकतो. त्यापेक्षा एकच उमेदवार द्या आणि त्याला मतदान करुन तुमची राजकीय ताकद दाखवून द्या, असं आवाहन
जरांगे पाटलांनी केलं. फक्त मराठा समाजाचे नाही तर सर्वच जातीचे उमेदवार द्या. पण मला राजकारणात जाण्यास सांगू नका. तो माझा मार्ग नाही, असं पाटील म्हणाले.