माय महाराष्ट्र न्यूज:वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मागील काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही
राज्यांमध्ये उन्हाच्या झळा, तर काही भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अशातच येत्या २६ मार्च रोजी पश्चिम हिमाचल प्रदेशावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात जोरदार वारे वाहू शकतात.परिणामी हवामानात मोठा बदल होऊन येत्या ४८ तासांत बिहार, झारखंड आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा
इशारा देण्यात आला आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब,
हरियाणा, राजधानी दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये देखील या काळात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.हिमाचल प्रदेशमध्ये मंगळवारपासून हवामानाची
स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २८ मार्चला हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा दिला. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मात्र, आता राज्यातील उन्हाचा
कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे.होळीनंतर राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई पुण्यासह ठाणे शहरात उन्हाचा कडाका वाढणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. अशातच उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला.