माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली. निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
त्यामुळे ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना निलेश लंके यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. ते भावूक झाले. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज
विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके म्हणाले. यावेळी निलेश लंके यांनी राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात
आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं.निलेश लंके यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. “रावणाचा देखील नाश झाला आहे, अहंकाराचा नाश झाला तर तुम्ही कोण? दिवा
फडफड करत आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे. मात्र आमच्याकडे जीवाभावाचे मावळे आहेत. मी आयुष्यात पैसे कमवले नाहीत. लाख मोलाची माणसं कमावले आहेत. त्यांची किंमत होऊ शकत नाही. मला माझं साम्राज्य टिकण्यासाठी राजकारण करायचं नाही. मला जिरवा जिरवीचं राजकारण करायचं नाही.
लोकांचं काम करण्यासाठी मला काम करायचं आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तुम्हाला इतका घाम फुटण्याची गरज काय?”, असा सवाल निलेश लंके यांनी केला.“अनेक लोकांनी सांगितले आम्ही तुमच्यासोबत, तर अनेक जेष्ठ लोक मला येऊन भेटले. तालुक्याचे
राजकारण कसंही असू द्या. मात्र आम्ही तुमच्या बाजूने, असं म्हणाले. मी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. नंतर कोविड आला. अनेक जण मला म्हणाले होते तुम्ही गुहाटीला गेले का? आम्ही अजित दादांसोबत गेलो.
छातीवर दगड ठेऊन निर्णय घेतला. मी आमदार असू नाहीतर नसो. मात्र अजित पवार राजकारणात राहिले पाहिजेत”, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली.