शेवगाव/सुखदेव फुलारी
तुमच्या कामाची पध्दत वाखणण्याजोगी आहे. जे काम तुम्ही हातात घेता ते ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता प्रामाणिकपणे करता. जिल्हा परिषदेमार्फत कुठल्याही योजना निघतात. तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी तुमचीच आठवण येते. तुमच्या प्रलंबित प्रश्नासाठी व वेतन वाढीसाठी तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. पुढील काळात तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी चंद्रशेखर घुले यांना साथ द्या, असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्तान शेवगाव येथे
शेवगाव तालुक्यातील गुणवंत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा कर्मचाऱ्यांचा गौरव व सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे संचालक संजय कोळगे, पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकल्प लोणकर, डॉ. भागनाथ काटे, उज्ज्वला मेरड आदी प्रमुख उपस्थित होते.
माजी सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील म्हणाले,शासनाच्या कुठल्याही योजना तुम्ही तळागाळापर्यंत राबविण्याचे काम केले आहे. कोरोना काळात ही जीव मुठीत धरून तुम्ही काम केले. तुम्ही आहात म्हणून सरकार आहे. मात्र, तुमच्या मानधनाचा किंवा वेतन वाढीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तो सोडविण्यासाठी आपला लाडका भाऊ विधानसभेत पाठविण्यासाठी पुढाकार घ्या. तुमच्यामध्ये दुर्गा भवानीची ताकद आहे. येणाऱ्या काळात तुम्हीच लोकप्रतिनिधी बदलू शकता.
श्री.काकासाहेब नरवडे म्हणाले, ४० वर्षांपासून सातत्याने पंचायत समिती घुले यांच्याच ताब्यात आहे. तुमचे प्रश्न सोडविण्याची ताकद फक्त घुले यांच्याकडे आहे. स्व. घुले पाटलांचा वारसा पुढे नेणारा भाऊ आपल्याला निवडून द्यायचा आहे.
यावेळी आरती गणगे, सुनीता गांडुळे, मंगल लोंढे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ३० अंगणवाडीसेविका, अंगणवाडी मदतनीस व आशा कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कोळगे यांनी, तर दीपक कुसळकर यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला मेरड यांनी आभार मानले.