नेवासा
मजुरांची उपलब्धता ही शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या असून त्यावर मात करण्यासाठी कृषी अवजारांच्या वापराबद्दल शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक जागरूक रहावे व त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्यावी असे आवाहन श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांनी केले.
भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथे सोमवार दि. 23 सप्टेंबर रोजी आयोजित रब्बी पिके व कांदा कार्यशाळेचे उद्घाटन माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मिलिंद कुलकर्णी, दादासाहेब गंडाळ, दहिगावचे उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे, माजी सरपंच सुभाष पवार, काकासाहेब घुले, कडूबाळ घुले हे व्यासपीठावर उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.शामसुंदर कौशिक यांनी रब्बी हंगामातील प्रमुख पिके जसे ज्वारी हरभरा व पूर्व हंगामी ऊस लागवड याबद्दल उपस्थिती शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. नंदकिशोर दहातोंडे यांनी रब्बी हंगामातील कांदा पिकाबद्दल मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रामुख्याने रब्बी हंगामासाठी कांद्याच्या जातींची निवड व रोपवाटिका व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या चुका व त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.
माणिक लाखे यांनी कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामीण युवक युवतींसाठी ‘कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन’ तसेच ‘मुक्तसंचार गोठा व दुग्ध उत्पादन व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण वर्गात सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र कडील उपलब्ध सुविधा व तंत्रज्ञान एकाच ठिकाणी अवगत होण्याच्या दृष्टीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केव्हीकेचे नारायण निबे, सचिन बडधे, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट, प्रवीण देशमुख, संजय थोटे, अनिल धनवटे यांनी प्रयत्न केले.
इंजिनियर राहुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माणिक लाखे यांनी आभार मानले.