नेवासा
नेवासा फाटा येथे वाहनाची धडक देवुन खुनाचा प्रयत्न, सुपारी घेणारे मारेकरी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहेत.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक १६/०८/२०२४ रोजी सकाळी ०९.३० वा. चे सुमारास फिर्यादी नामे श्रुती सौरभ पोखरकर रा. बालेवाडी, स्टेडीयम जवळ, म्हाळुंगे, ता. जि. पुणे यांचा चुलत भाऊ शंतनु पोपट वाघ हा त्याचेकडील शाईन मोटारसायकलवरुन त्याचे घरुन निघुन खडका फाटा येथील खडीक्रेशवर जात असतांना बोलेरो गाडीमधील आरोपीने कट कारस्थान करुन त्याचा पाठलाग करुन बोलेरो गाडीने शाईन मोटारसायकलला जोराची धडक देवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. ७७६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ६१ (२) प्रमाणे खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वरील गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न नसल्याने व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे वर्ग करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अतुल लोटके, संतोष लोडे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संदीप दरंदले, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन गुन्ह्यातोल आरोपी निष्पन्न करुन आरोपी अटक करणेबाबत आदेश देण्यात आलेले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनाठिकाणी भेट देवुन तसेच जखमीचे घरापासुन ते घटनाठिकाणापर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता त्यामध्ये जखमीचे मोटारसायकलचा एक पांढरे रंगाची बोलेरो गाडी पाठलाग करतांना दिसुन आली. सदर बोलेरो गाडीवरुन आरोपींचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे व गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन आरोपी नामे १) शिवनाथ ज्ञानदेव चावरे (वय ४१ वर्षे), रा. जळके खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर, २) ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे (वय ४२ वर्षे), रा. पावन गणपती मंदीरासमोर, नेवासा, ३) संदीप साहेबराव धनवडे (वय ३९ वर्षे), रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्याचे कारणाबाबत सखोल व बारकाईने तपास करता आरोपी नामे शिवनाथ चावरे याचे भाचीचे सन २०२२ मध्ये जखमी नामे शंतनु पोपट वाघ रा. नेवासा खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर याचेसोबत लग्न झालेले होते. मागोल ०१ वर्षापुर्वी शिवनाथ चावरे याचे भाचीने गळफास घेवुन आत्महत्या केलेली असुन त्या द्वेषातून आरोपी शिवनाथ चावरे गुन्ह्याचा कट रचुन याने रेकॉर्डवरील आरोपी ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे, संदीप साहेबराव धनवडे व त्यांचे इतर साथीदारांना सुपारी देवुन गुन्हा घडवुन आणला असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील आरोपी नामे ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द खुनाचा प्रयत्न, दंगा करणे असे एकुण ०४, व आरोपी नामे संदीप साहेबराव धनवडे याचेविरुध्द जबरी चोरी, दंगा करणे असे ०२ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि तुषार धाकराव हे करीत असून आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर
वैभव कलुबर्म व उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग सुनिल पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.