Sunday, October 6, 2024

नेवासा- अवघ्या ८० सेकंदात ज्ञानेश्वरी पारायण

नेवासा

ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या ७३४ व्या जयंतीनिमित्त व संत एकनाथ महाराजांनी संशोधित केलेल्या ज्ञानेश्वरीला ४४० वर्ष पूर्ण होत असल्याने नेवासा येथे मिरवणूक, पारायण व आरती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एकनाथ महाराज संबोधीत ज्ञानेश्वरी जयंती निमित्त अवघ्या ८० सेकंदात ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले.

ज्ञानेश्वरी जन्मोत्सव निमित्ताने सायंकाळी ज्ञानेश्वरी पारायण सोहळयात संपूर्ण ज्ञानेश्वरीचे १ मिनीट २० सेकंदात पूर्ण वाचन करून एक विश्व विक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ज्ञानोबा माऊलीच्या गजराने माऊलींची कर्मभूमी दुमदुमली होती. हा सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, रामेश्वर महाराज कंठाळे व देविदास महाराज म्हस्के तसेच वारकरी संप्रदाय यांनी आयोजित केला होता. ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानामृत नेवासे नगरीत
सांगितले त्यास ७३४ वर्षे झाली तर शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांनी दुरुस्त केलेल्या ज्ञानेश्वरीला ४४० वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सोमवारी दुपारी चार वाजता ज्ञानेश्वरी रचनास्थान श्रीक्षेत्र नेवासा येथून पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये माऊलींच्या प्रतिमेसह टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे नेतृत्व रामेश्वर महाराज कंठाळे यांनी केले.

मिरवणुकीचे चौकाचौकांत स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत आलेल्या माऊलींचे पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

अग्रभागी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेतलेले वारकरी भाविक, सजविण्यात आलेला रथ, भजनी मंडळ, महाराज मंडळी, डोक्यावर तुलसी कलश व ज्ञानेश्वरी घेतलेल्या महिला भाविक असे या शोभायात्रा मिरवणुकीचे स्वरूप होते. मंदिराच्या प्रांगणात ज्ञानेश्वरी वाचनासाठी अध्यायाच्या प्रमाणे अठरा लाईन आखण्यात आल्या होत्या. उपस्थित तीन हजार पैकी प्रत्येक भाविकाला अध्यायाप्रमाणे तीन-चार अशा ओव्या देण्यात आल्या होत्या.

वीस सेंकदात संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचनाची विश्वविक्रमी नोंद केली. तद्नंतर आरती करण्यात आली व पसायदान झाले.
पारायण सोहळ्याचा शुभारंभ देविदास महाराज म्हस्के, रामेश्वर महाराज कंठाळे, नंदकिशोर महाराज खरात, अध्यक्ष पांडुरंग अभंग, विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. जयंती सोहळ्याच्या निमित्ताने देविदास महाराज, अध्यक्ष पांडुरंग अभंग, सोहळा संयोजक रामेश्वर महाराज कंठाळे यांनी मनोगतातून माऊलींचे कार्य व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे महत्व विषद केले.
यावेळी गहिनीनाथ महाराज आढाव, डॉ. शुभम कांडेकर, अंजाबापू कर्डिले, राम महाराज खरवंडीकर, भाऊसाहेब महाराज, विश्वस्त ज्ञानेश्वर शिंदे, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पसायदानाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. बाळू मुथ्था व परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे करण्यात आले.

 विश्वविक्रम करणाऱ्या ज्ञानेश्वरी वाचनासाठी पाथर्डी तालुक्यातील दत्ताचे शिंगवे व श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील भाविक दिंडीने येथे आले होते. तर एका कानडी सासर असलेल्या अहमदनगर येथील क्रांती नाईक यांनी आरशात सरळ व वाचताना उलटी दिसेल अशी हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहली होती तिचे प्रकाशन उपस्थित महाराज मंडळींच्या हस्ते करण्यात आले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!