Sunday, October 6, 2024

सनातन वैदिक हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ व पवित्र-समाधान महाराज शर्मा

शेवगाव/अविनाश देशमुख

मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर केला पाहिजे. आपण सर्वजण हिंदू राष्ट्रात जन्माला आलो याचा अर्थ आपण हिंदू आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हिंदू असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. सनातन वैदिक हिंदू धर्म हा सर्वात श्रेष्ठ , पवित्र व शाश्वत धर्म आहे. त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावरून हिंदू धर्म सोडायचा नाही, असा खणखणीत सल्ला शिव महापुराण कथाकार प्रवक्ते श्री. समाधान महाराज शर्मा यांनी दिला.

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमित्ताने शेवगावच्या खंडोबा मैदानात सुरू असलेल्या शिव महापुराण कथेचे ६ वे पुष्प गुंफताना श्री. शर्मा महाराज बोलत होते. कथेदरम्यान त्यांनी रुद्र संहितेतील पाचव्या खंडाची विस्तृतपणे मांडणी करून भगवान शंकराच्या २८ अवताराबाबत विवेचन केले. कथेसाठी श्रोत्यांची अलोट गर्दी होती. आजवर शेवगावमध्ये संपन्न झालेल्या सर्व कथांच्या गर्दीचे उच्चांक शिवपुराण कथेने मोडले.
श्री. शर्मा महाराज पुढे म्हणाले, सोन्याचा भाव काही असू द्या, माणसाचा भाव शुद्ध असला पाहिजे. ज्याची नीतिमत्ता चांगली त्याचे देव कधीही वाईट करत नाही. मात्र, माणसाने आपल्या मेंदूतील वाईट विचार डिलीट करून साधू संतांचे विचार मेंदूत घुसवले पाहिजेत. पैशाने सर्व काही मिळते. मात्र, प्रेम मिळत नाही. त्यासाठी माणसाला प्रेमाची भूक असली पाहिजे. ती भूक मनुष्याला भगवंताच्या चिंतनातून प्राप्त होते.
हजारो प्रकारचे गंध कपाळावर लावून उपयोग नाही तर, चारित्र्याच्या गंधाचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, जीवन जगताना डाग लावू देऊ नका. पवित्र व शुद्ध अंतकरणाने जगा. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही असे सांगून श्री. शर्मा महाराज म्हणाले, सनातन वैदिक हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ व पवित्र धर्म आहे. कोणाच्या सांगण्यावरून कधीही धर्मांतर करू नका. आपण हिंदू आहोत म्हणून आपला जन्म हिंदू राष्ट्रात झाला, याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे.

*श्रोते भाग्यवान…

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील जयंतीनिमित्त घुले परिवाराने आयोजित केलेल्या महा शिवपुराण कथेचे प्रवक्ते समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून कथा ऐकणारे श्रोते भाग्यवान आहेत. कथा श्रवणाने मनुष्याचे सर्व इंद्रिय व शरीर पवित्र होते तसेच कुटुंबावर संस्कार होतात. शंकर महाराजांचे आशीर्वाद श्री. शर्मा महाराजांच्या पाठीशी कायम आहेत. कथा आयोजक सत्शील घुले कुटुंबीयांना शुभेच्छा.
— योगी प. पू. माधवबाबा (पाथर्डी)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!