नेवासा/प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे व सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाटा येथे आज दि.२५ सप्टेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाजाकडून दिलेल्या निवेदनात मराठा समाजाला तातडीने ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा आंदोलनात समाज बांधवावर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात यावे, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे व आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनावेळी संभाजी माळवदे यांनी अनेक राज्यात आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात बत्तीस टक्के मराठा समाज असुन तो आज सामजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झाले आहे म्हणून लोकसंख्याच्या प्रमाणात आरक्षण मिळालेच पाहिजे. संतोष काळे यांनी अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी अन्य जमातीला आरक्षण दिले मात्र मराठा समाजाचा प्रश्न तसाच चिघळत ठेवला. आता सर्व मराठा नेत्यांनी एकत्र येऊन एकदाचा तोडगा काढावा.तर अनिल ताके यांनी आरक्षण मिळाले नाही तर नेत्यांना,लोकप्रतिनिधींना गावबंदी करावी लागेल, आरक्षण द्या नाहीतर गावात येवू नका असे ठणकावून सांगा असे जनतेला आवाहन केले. गणपत मोरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्व समाज बांधवांची इच्छा असुन आम्ही लहान भाऊ या नात्याने मोठ्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. अंजुम पटेल यांनी सकल मुस्लिम समाज हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खांद्याला खांदा देवून लढा देईल असे स्पष्ट केले. यावेळी रावसाहेब घुमरे,रासपाचे त्रिंबक भदगले, गणेश झगरे,यांनी देखील आपले विचार मांडले. या आंदोलनात सतिष तऱ्हाळ, पांडुरंग निपुंगे, अभिषेक पटारे,जालिंदर निपूंगे,पोपटराव शेकडे, सुमित पटारे,गणेश चौगुले, शेषराव गव्हाणे, अफरोज पटेल, योगेश दारुंटे आदीसह मराठा बांधव सामील झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.