माय महाराष्ट्र न्यूज:विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या हालचालींना वेग दिला आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे.
दोघेही पिता-पुत्र पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबाची अर्धा तास चर्चा झाल्याचं समजत आहे. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे.
पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अकोले विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. मधुकर पिचड आणि वैभव
पिचड राष्ट्रवादी-सपामध्ये गेल्यास अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय समीकरण बदलू शकते. भाजपसाठी हा मोठा धक्का असू शकतो.