माय महाराष्ट्र न्यूज: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत अनेकदा असा दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जावं यासाठी 2022 साली सर्व आमदारांनी सह्या करून तशा स्वरूपाचं पत्र शरद पवारांकडे दिलं होतं.
मात्र, आज (2 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी मुंबई तक च्या चावडीवर बोलताना याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडून अनेक आमदार घेऊन थेट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. ज्यानंतर निवडणूक
आयोगाने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचं घड्याळ चिन्ह देखील दिलं. ज्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आणि शरद पवार यांना नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव घ्यावं लागलं. या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच अजित पवारांच्या पक्षाकडून अनेकदा असा दावा केला की, आपण सत्तेत जावं असा सगळ्या
आमदारांचा आग्रह होता. पण आता त्यांचा हाच दावा रोहित पवारांनी चावडीवर बोलताना खोडून काढला आहे. सुनील तटकरे मुंबई तक शी बोलताना म्हणाले की, 2022 साली एकनाथ शिंदे हे जेव्हा सूरतला निघून गेले त्यानंतर सगळे आमदार हे अजित पवारांकडे गेले आणि म्हणाले की, आपणच
सत्ता स्थापन केली असती त्यांना कशाला आपण मुख्यमंत्री पद देतोय.. तर सगळ्या आमदारांनी सह्या केल्या होत्या.. भाजपला पाठिंबा देण्यासाठी.. तटकरेंचं म्हणणं होतं की, आता जे आमदार बोलतायेत त्यांनी सुद्धा सह्या केल्या होत्या. तेव्हा नक्की काय झालं होतं? तुम्ही सुद्धा सही केली होती का?
रोहित पवार म्हणाले की दीड वर्ष झाली ना.. बोलतायेत ना.. मग पेपर दाखवा ना.. तेव्हा विषय हा होता की, विरोधी पक्ष नेता कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली.. मग दादांना करा अशी आमची भूमिका होती. विरोधी पक्षनेता दादांना बनवा यासाठी माझी सुद्धा सही आहे ना.
कोणताही विषय हा पवार साहेबांना सांगितल्याशिवाय होत नव्हता. होणार पण नाही.. हे सगळ्यांना तिथे माहीत होतं. त्यामुळे हे जे कोणी आज भाजपसोबत गेलेले आहेत उद्या त्यांनी कदाचित अनेक चर्चा केल्या असतील. पण त्या चर्चेत हेच 7-8 जणं होते जे बिचारे अडकलेले होते.. त्यापलीकडे दुसरं कोणीच नव्हतं.
आता ते पलीकडे सत्तेत गेले बाकी आमदार.. तो त्यांचा-त्यांचा विषय आहे. पण हे जे काही म्हणतात सह्या झालेल्या आहेत.. दाखवा ना एकदा लोकांसमोर.. आता दाखवा.. कशाला उशीर करता. असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपला पाठिंबा देणाऱ्या पत्रावर सह्या करणारं पत्र दाखवावं असं थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला दिलं आहे.