माय महाराष्ट्र न्यूज:भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ऐवजी त्यांचे वडील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिले.
संगमनेर तालुक्यातील कोळेवाडे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिले. ते म्हणाले, भाजपचे माजी खा. सुजय विखे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मात्र त्यांच्याऐवजी त्यांचे वडील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लढावे.
माझ्यासह संगमनेर तालुक्यातील जनता त्यांचे स्वागतच करेल. त्यांच्याविरोधात संगमनेरमध्ये माझी लढण्याची तयारी आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडून स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा आहे. त्याबाबत आ. थोरात म्हणाले,
राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जागा वाटप विजयादशमीपर्यंत पूर्ण होईल. मात्र काँग्रेस स्वतंत्र लढणार या चर्चा नेमक्या कुठून येतात हे मला माहीत नाही.
दरम्यान संपूर्ण नगर जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, आणि अहमदनगर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस या ६ जागा लढविणार तर आहेच, परंतु काँग्रेसने अकोले, शिर्डीची जागाही मागितली आहे असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.