माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगरचे नाव बदलण्याची अनेक दिवसांची मागणी होती. केंद्र सरकारने जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंजूरी दिली आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर,
उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे.राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
“अहील्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही मनापासून आभार!” अशी पोस्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याला रेल्वे मंत्र्यांनी मंजूर दिली होती. महिनाभरापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या नामांतराची घोषणा केली होती.
अहिल्यानगर असं नामांतर का?
भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेली शहरांची नावं बदलण्याचा सत्ताधारी पक्षाचा राजकीय अजेंडा आहे. त्यानुसार आत्तापर्यंत अनेक शहारांची नावं बदलण्यात आली आहेत. त्यात अहमदनगर
जिल्ह्याचाही समावेश आहे. पण याच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. त्या इंदूरच्या मल्हारराव होळकर यांच्या सून.
मल्हाररावानंतर अहिल्यादेवी यांनी जवळपास २८ वर्षे माळवा राज्याच्या महाराणी म्हणून राज्य चालवलं. या काळात त्यांनी देशभरात धर्मशाळा, मंदिरे, विहिरी, बारवं, अनेक अन्नछत्रे उघडली. त्यामुळं अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं नाव या जिल्ह्याला देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतला.