नेवासा
नेवासा नगरपंचायत प्रशासकीय कार्यालय हे शहरातच असावे. कुठल्याही परिस्थितीत शहराच्या बाहेर कार्यालय स्थलांतरित करू नये असे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
मुख्याधिकारी सोनाली मात्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या आठ वर्षांपासून नेवासा नगरपंचायतीचे प्रशासकीय कार्यालय हे ग्रामपंचायतीच्या जुन्या कार्यालयातच चालू होते. मागील वर्षी या रखडलेल्या प्रशासकीय कार्यालय इमारतीच्या बांधकामला मंजुरी देण्यात आली व शहराच्या बाहेर कोर्टा शेजारी इमारतीचे बांधकाम सूरु करण्यात आले. परंतु नेवासा शहर व नविन कार्यालय यातील अंतर हे जवळ जवळ एक किलोमीटर पेक्षा जास्त असल्याने शहरातील नागरिकांनी याविषयी तीव्र संताप व्यक्त केला. ज्या ठिकाणी सध्या नगरपंचायत कार्यालय आहे त्याच ठिकाणी नवीन इमारत बांधकाम करायला हवे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याविरोधात हळू हळू तीव्र पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे.
यावेळी संभाजी माळवदे यांनी नगरपंचायत प्रशासकीय कार्यालय हे शहरातच ठेवण्यात यावे. यामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच जास्त होईल. प्रशासकिय कर्मचाऱ्यांसाठी फक्तं सोयीस्कर होईल. जनतेसाठी उभारलेले कार्यालय हे जनतेलाच त्रासदायक ठरणार आहे. कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायत प्रशासकीय कार्यालय हे नेवासा शहराच्या बाहेर जावू देणार नाही असे ठामपणे सांगितले.
अनिल ताके यांनी याविरोधात लवकरच नेवासा शहरात नागरिकांच्या सह्यांचे अभियान राबविणार व नगरविकास मंत्र्यांना या सह्याचे निवेदन दिले जाणार. संतोष काळे यांनी याविरोधात जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून शहरांतील नागरिकांनी नंतर पश्र्चाताप करण्यापेक्षा आज या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
काँग्रेसचे अंजुम पटेल यांनी प्रशासकिय कार्यालयाचे बांधकाम शहराच्या बाहेर करण्याअगोदर जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते परंतु आज हुकूमशाही सारखे मी करेल तो कायदा अशी परिस्थीती आज आहे. पण काहीही झाले तरी कार्यालयं स्थलांतरित होवू देणारं नाही. वेळ पडली तर नविन बांधकाम बंद पाडू.
मुख्याधिकारी सोनाली मात्रे यांच्याशी चर्चा करुन निवेदन देण्यात आले. निवेदनावेळी रावसाहेब घुमरे, त्रिंबक भदगले, गणपत मोरे, विकास चव्हाण, आदीसह शहरांतील नागरिक उपस्थित होते.