माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेचा अद्यापपर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. पण अद्यापही जर तुम्ही या योजनाच्या लाभापासून
वंचित राहिला असाल? तर तुमच्यासाठी आणखी एक संधी सरकारनं उपलब्ध करुन दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता लाडकी बहीण योजनेला मुदत वाढ देण्यात आली असून १५ ऑक्टोबरपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत पात्र महिलांना या योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येणार आहेत. या योजनेंतर्गत महिन्याला १५०० रुपये शासनाकडून थेट बँकेत जमा केले जातात.
या टप्प्यात जे नव्यानं अर्ज सादर करणार आहेत. त्यांनी फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज भरावेत अशी सूचना राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. यापूर्वी हे अर्ज नारीशक्ती दूत नावाच्या मोबाईल अॅपद्वारे भरले जात होते. आत्तापर्यंत या अॅपच्या माध्यमातून
सुमारे ८ लाखांहून अधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं
सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल याची तारीख समोर आली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार १३ किंवा १४ तारखेला आचारसंहिता लागू शकते असं या नेत्यानं म्हटलं आहे.