माय महाराष्ट्र न्यूज:घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्णवेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत
असलेल्या मुली-महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मूर्तरूप येणार आहे, अशी माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.अमरावती दौऱ्यावर
सायन्सकोर मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. पुढे बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, राज्याला राजमाता मॉं जिजाऊ,
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या महिलांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. महिलांचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. विविध योजनांची माहिती महिलांना माहिती व्हावी,
यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना बळ देणारी आहे. महिलांचे अर्ज पात्र झाल्यापासून त्यांना लाभ देण्यात येत आहे. ही योजना निरंतर सुरूच राहणार आहे. मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा
योजनेतून तीन गॅस सिलिंडर, पिंक रिक्षा, बचतगटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन, तीर्थक्षेत्र आदी असंख्य योजना महिला सशक्तीकरण करण्यासाठी राबविण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजना यशस्वी केली आहे. त्यांच्या कार्याची
दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात लाडक्या बहिणी, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अंगणवाडी सेविका, नवतेजस्वीनी उद्योजिका, महिला बालविकास विभागातील अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच महिला बचतगटांना कर्ज वितरण धनादेश वाटप करण्यात आले.