नेवासा
विरोधी उमेदवाराची वैयक्तिक प्रतिमा खराब होईल असा द्वेषपूर्ण प्रचार उमेदवारांनी करू नये, असे आवाहन नेवासा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अरूणकुमार (भाप्रसे) यांनी केले.
नेवासा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अरूण उंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय बिरादार उपस्थित होते.
श्री.अरूणकुमार म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासन करत असते. आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची आहे. तेव्हा आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही. यांची दक्षता घेण्यात यावी. प्रचार करतांना वैयक्तिक टीका – टिपण्णी करू नये.
निवडणूकीत येणार खर्चाचा अहवाल प्रत्येक उमेदवाराला वेळोवेळी निवडणूक प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.उंडे म्हणाले, प्रचार व प्रसिद्धीकामी विविध प्रकारच्या १० परवानग्या घेणे आवश्यक आहे. या परवानग्या नेवासा तहसील कार्यालयातील एक खिडकी कक्षामार्फत ऑफलाईन देण्यात येतील व ऑनलाईन परवानग्या ह्या सुविधा पोर्टलवरुन घेता येतील. सोशल मिडीयावरील प्रचाराच्या परवानग्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील एमसीएमसी कक्षामार्फत घेता येतील.
यावेळी उमेदवारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत प्राथमिक माहिती देण्यात आली. सेकंड रेंडमायझेशन झाल्यानंतर कोणते मशीन कोणत्या केंद्रावर जातील, हे निश्चित होईल. याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना दिली.