नेवासा
नेवासा विधानसभे करिता बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान झालेल्या मतपेट्या मतदानाच्या रात्री उशीर पर्यंत नेवासा फाटा स्थित शासकीय धान्य गोडाऊनच्या स्ट्राँग रूम येथे पोहचलेल्या आहेत. त्यानंतर मतपेट्या(ईव्हीएम मशीन) व इतर साहित्यांची मोजदाद करून स्ट्रॉंग रूम पहाटे सिल करण्यात आले असुन सदर ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
नेवासा पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावर
स्ट्राँग रूम सुरक्षेची जबाबदारी
नेवासा यांच्यावर असुन सुरक्षेचे तीन लेयर(स्तर) केलेले आहेत. स्ट्रॉंग रूमचा पहिला लेयर म्हणजे स्ट्रॉंग रूमच्या जवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाचे एक प्लाटून म्हणजे 30 जवान 24 तास सुरक्षेसाठी तैनात असतील. तसेच स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेच्या दुसऱ्या लेअरमध्ये गुजरात राज्य राखीव पोलीस बलाचे एक प्लाटून 24 तास तैनात आहे. तसेच तिसऱ्या लेयर मध्ये जिल्हा पोलीस दलाकडील अधिकारी अंमलदार नियुक्तीस आहेत. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत, त्याचे 24 तास निरीक्षण करण्यात येत आहे. नागरिकांना स्ट्रॉंगरूम पासून 200 मीटर परिसरामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. पुरेशा विद्युत प्रकाशासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्ट्रॉंगरूमच्या सुरक्षेची पाहणी वरिष्ठ अधिकारी प्रत्येक तासाला भेट देऊन पहाणी करीत आहेत. या भेटीचे आणि पहाणीच्या सविस्तर नोंदी रजिस्टरला ठेवल्या जात आहेत. मतमोजणीच्या दिवशी कडक सुरक्षा ठेवली असून स्ट्रॉंग रूममध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मेटल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी करूनच आत सोडण्यात येणार आहे. काल आणि आज निवडणूक निरीक्षक तसेच मतमोजणी निरीक्षक यांनी भेटी देऊन मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांनी देखील भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे.
मतमोजणी बंदोबस्तसाठी आज पहाणी करून आखणी करण्यात आलेली असून एक पोलीस उप अधीक्षक, 3 पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व 100 जवानांचा ताफा, स्ट्रायकींग फोर्स, दंगा नियंत्रण पथके तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार असून प्रत्येक फेरीच्या घोषणेसाठी लाऊड स्पीकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने ज्ञानेश्वर कॉलेजच्या पाठीमागे ठाणगे मैदानावर पार्क करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.