Thursday, December 5, 2024

नजीक चिंचोलीतील आत्या-भाच्याला देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधीचे निमंत्रण

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोलीच्या सौ.रेणुका सुनील गोंधळी व त्यांच्या १० वर्षे वयाचा भाचा वेदांत भागवत पवार यांना उद्या गुरुवार दि.५ डिसेंबर रोजी होत असलेल्या महायुती सरकारच्या (देवेंद्र फडणवीस) शपथविधि सोहळ्यास विशेष अतिथी (VIP) म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.

नजिक चिंचोलीच्या रहिवाशी असलेल्या सौ.रेणुका सुनील गोंधळी यांचा कनकोरी (ता.गंगापुर) येथील भाचा
वेदांत हा २०१९ मध्ये ६ वर्षे वयाचा पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित होता. वेदांतचे वडील वाळुंज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या बालकाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्या परीने मदत करून त्यावर उपचार सुरू केले. मात्र, या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अडचणीचे ठरू लागले. पालकांची सारी पूंजी त्यासाठी खर्ची पडली, त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले.अशा वेळी आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी या नगर जिल्ह्यातील नजीक चिचोली (ता. नेवासा) येथे राहतात. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून मद‌तीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तात्काळ १ लाख ९० हजारांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रेन रुग्णालयात बेदांतवर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे या बालकाला जीवनदान मिळण्यास मदत झाली. मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेमुळे वेदांतचे कुटुंबीय भारावून गेले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभीष्टचिंतनाचे औचित्य साधून श्रीमती रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले.
त्यासोबतच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन त्या म्हणतात, “आपण माझ्या मोबाईलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरुपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवित आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो. या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.”

————-
*विशेष अतिथी (VIP) म्हणून शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण…

ही घटना लक्षात ठेऊन महाराष्ट्र शासनाच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी शिवशाहीर सुनिलजी गोंधळी,सौ.रेणुका सुनिल गोंधळी व वेदांत भागवत पवार यांना महायुती सरकारच्या शपथविधि सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

या निमंत्रण संदेशात म्हंटले आहे की,
“महाराष्ट्रातील एकाही रुग्णावर पैशाअभावी उपचार थांबता कामा नयेत…” असा कानमंत्र डॉ.ओमप्रकाश शेटे यांना देणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. लाखो रुग्णांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आपणास लाभली आहे. महाराष्ट्रातील काही निवडक रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांना विशेष अतिथी (VIP) म्हणून या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहण्याची संधी लाभली आहे. शिवशाहीर सुनिल गोंधळी(चिंचोलीकर),सौ रेणुका सुनिल गोंधळी व वेदांत भागवत पवार या सर्वांनी गुरूवार,दि.५ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथील शपथविधि सोहळ्यास उपस्थित राहावे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!