नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील शहापूर येथील शिवाजीराव राजधर कोलते पाटील यांची महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
दि.१३ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल शगुन मध्ये राज्यातील पोलीस पाटीलांची ऐतिहासिक राज्यस्तरीय परिवर्तन बैठक राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर पाटील यांच्या अध्यक्षते खाली तसेच राज्य सचिव कमलाकर मागले, राज्य संघटक बळवंतराव काळे,राज्य सहसचिव गोरख टेंभकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष जब्बार पठाण, नागपूर विभागीय अध्यक्ष विजय घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
गावं कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष सेवानिवृत्त असल्याने, राज्यातील पोलीस पाटलांच्या हितासाठी व प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी कार्यरत पोलीस पाटीलच संघाच्या राज्य अध्यक्ष पदावर असला पाहिजेत अशी गेली वर्ष दोन वर्षापासून राज्यातील पोलीस पाटलांची मागणी जोर धरत होती. राज्यातील पोलीस पाटलांच्या एकंदर मताचा आदर करून सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये संघाचे संस्थापक सदस्य, राज्य पदाधिकारी,विभागीय पदाधिकारी,जिल्हा अध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्ह्याचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संघाचे संस्थापक सदस्य तथा नगर जिल्ह्याचे अध्यक्ष व लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेले शहापुर (ता.नेवासा) गावचे पोलीस पाटील शिवजीराव कोलते पाटील यांची राज्य अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
राज्य संघटने मध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच संघटनेची नवीन नियमावली तयार करण्यासाठी राज्याची एक कोर कमिटी नेमण्यात आली असून त्या कोर कमिटीचे अध्यक्ष म्हणून राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर पाटील यांची निवड करून राज्य अध्यक्ष व काही जिल्हा अध्यक्ष,जिल्हा सचिव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली .
यावेळी संघाच्या सर्वच पदाधिकारी यांनी नवनिर्वाचीत अध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी, संघाच्या पारदर्शक कारभारासाठी तसेच पोलीस पाटलांच्या उर्वरित मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.