नेवासा
उतारवयात आर्थिक गुंतवणूक करतांना आपली फसवणूक तर होणार नाही ना याची काळजी घ्या, ऑनलाईन फसवणूकिला बळी पडू नका, अनोळखी व्यक्ती सोबत व्यवहार करू नका, फिरायला जातांना हातचलाखी करणाऱ्यांपासून सावध रहा, प्रवास करतांनाही अपरिचित लोकांकडून काही खाऊ नका, कधी आपली फसवणूक झाली असे वाटल्यास पोलीसांना कळवून इतरांनाही जागरूक करा असा सल्ला नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिला.
कुकाणा येथे जेष्ठ नागरिकांच्या संजीवनी ग्रुपच्या वतीने आयोजित सेवा निवृत्त शिक्षकांच्या मेळाव्यात श्री. जाधव यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. प्रारंभी संयोजक नामदेवराव उंडे यांनी प्रास्तविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
श्री. जाधव यांनी चोऱ्या, फसवणूक, आर्थिक लुबाडणूक, घरफोडया, या विषयावर काळजी कशीघ्यावी यां सह कायद्यांची माहिती देतांना उर्वरित जीवन सुखाचे कसे जगावे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उतार वयापर्यंत जमा केलेली पुंजी आरोग्य, घरबांधणी, मुलांचे लग्न कार्य यासाठी गुंतवणूक केली जात असते मात्र काही शेअरमार्केट सारख्या फसवणूकीच्या योजनात अशा गुंतवणुकीचे वाईट अनुभव मिळत असतात त्यामुळे ज्यांच्या कडे उत्पादकता नसते त्यांचेकडे गुंतवणूक करतांना फसवणूक अटळ असते.फिरायला जात असतांना काही जण आडवे येतात व दागदागिने काढून ठेवण्याचा सल्ला देत हाताचलाखी करून दागिने पळवतात. फसवणूक, चोऱ्या, फसवणूकीचे फोन कॉल अशा प्रकारात नेमकी काय काळजी घ्यावयाची असते हे निरीक्षक जाधव यांनी सांगितले. यावेळी उपस्थिताकडून विचारलेल्या शंका, प्रश्न यांना निरीक्षक जाधव यांनी उत्तरे दिली. तालुक्यातील गुन्हे प्रमाण, तपास, फिर्यादीस परत केलेला माल आदींचीही माहिती त्यांनी दिली.
भय्यासाहेब देशमुख, अशोक चौधरी, सुभाष भंडारी, गणगे सर,सुरेश बोगावत,दत्तात्रय गरड, अरुणकुमार देशमुख,बाळासाहेब भूमकर, डॉ अशोक ढगे, माजी प्राचार्य रघुनाथ आगळे, रामकृष्ण नवले,साहेबराव भणगे,कोरडे आदी यावेळी उपस्थित होते.