पुणे/सुखदेव फुलारी
राज्यातील जलसाक्षरता उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी यशदा, पुणे येथे दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिक महसूल विभागातील जलनायक, जलयोध्दा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक व जलकर्मीं प्रशिक्षकांची एक दिवसाची कार्यशाळा यशदाचे उपमहासंचालक तथा संचालक RGSA डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी व जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून राज्यभर जलसाक्षरता चळवळीचा लोकजागर करण्यात येऊन सर्व गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला.
दि. १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ही कार्यशाळा संपन्न झाली. दि.१० रोजी वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेचे संचालक गोवर्धन कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. दि.१३ रोजी जलनायक रमाकांतबापू कुलकर्णी, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत,
जलकर्मी श्री .लक्ष्मीकांत वाघवकर व हनुमंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
जलनायक रमाकांतबापू कुलकर्णी, यशदाचे वसंत राजूरकर,वाघाड कालवा उप विभागाचे सहाय्यक अभियंता निलेश वन्नेरे, अहिल्यानगरचे जलप्रेमी सुखदेव फुलारी, संतोष दहीफळे याप्रसंगी उपस्थित होते.
जलसाक्षरता चळवळीतून पाण्याचा कार्यक्षम, काटकसरीने व समन्यायी असा सुयोग्य वापर करण्यासाठी लोकप्रबोधन, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन व संवर्धन, निर्मित सिंचन क्षमतेचा प्रभावी वापर, पाणी हक्क, धरण, कालव्याबाबत आपलेपणाची भावना या जाणीवेसह पाणी वापर कर्त्यांची जबाबदारी, कर्तव्य व जागरुकता करणेसाठी जलनायक, जलयोध्दा, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक व जलकर्मींची स्वयंप्रेरित व स्वयंस्फूर्त फळीद्वारे लोकजागराचे आव्हानात्मक काम यशदातील जलसाक्षरता केंद्रातर्फे करण्यात येत आहे.
यशदाचे या लोकजागर अभियानात प्रविण प्रशिक्षकांना जलनायक रमाकांतबापू कुलकर्णी यांनी गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंद कसा तयार करावा याबाबद मार्गदर्शन केले.जलकर्मी श्री.हनुमंत देशमुख यांनी वाघाड प्रकल्पावरील पाणी वापर संस्था व लोकसहभाग यावर प्रबोधन केले. शासकिय अभियंते अधिकारी, कर्मचारी व पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी यांचा गेल्या, २५-३०वर्षापासून उत्तम समन्वय आहे. आजही दोन्ही बाजूने तो जोपासला जातो.हे वाघाडचे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी आक्टोबर /नोव्हेंबर मध्ये पाणी नियोजनाचे निमित्ताने धरणावर मान्यवरांचे हस्ते जलपूजन करुन पाण्याचे नियोजन करण्यात येते. याप्रसंगी प्रकल्पावरील बहुतेक शेतकरी, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, संचालक, प्रकल्पावरील सर्व अभियंते आवर्जून उपस्थित असतात.गेल्या दोन दशकाहून अधिक काळ होत असलेल्या या औचित्यपूर्ण उपक्रमामुळे लाभार्थ्यामध्ये धरण, कालवे, वितरीकाबद्दल आपलेपणा निर्माण झाला आहे व होत असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या विषयी बोलतांना लक्ष्मीकांत वाघवकर म्हणाले कि,केंद्र शासनाचे सन १९८७ चे जल धोरणानुसार सिंचन व्यवस्थापनेत शेतकऱ्यांचा सहभाग घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले. तसेच जलनिती-२००३ मध्ये देखील त्यासंबंधी सहभागी सिंचनाचे दृढीकरण केले आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने वरील कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर प्रत्येक विभागातील पाणी वापरकर्ते, लोकप्रतिनिधीची मते जाणून घेतली. तसेच शासनातील असलेल्या विभागांचेही अभिप्राय विचारात घेऊन मसुद्यात योग्य ते बदल करुन तो मसुदा विधान मंडळास सादर केला व विधान मंडळाने तो मंजूर केल्याचे सांगून कायद्यातील ८१ कलमापैकी निवडक कलम व नियमांचे तरदूदीबाबत विवेचन केले.शेवटी प्रविण प्रशिक्षकांना उद्देशून त्यांनी पाणी वापर संस्थांनी नियमित पाण्याची मागणी करुन पाणी वापर संस्था व पर्यायाने आपल्या सभासदांचे पाणी हक्क अबाधित ठेवावे व “ज्याचेकडे आज पाणी, उद्याचा तो अंबाणी” ही उक्ती सार्थ ठरवावी, असे आवाहन केले.अन्यथा उद्या हे पाणी तुमच्या हातातून निसटण्याची शक्यता असल्याची जाणीव त्यांनी प्रशिक्षणार्थींना करून दिली. पाणी वापर संस्थांची स्थापना, त्यांचे सक्षमीकरणाची आकडेवारी देऊन हे आव्हानात्मक प्रचंड व्याप्ती असलेले सांघिक काम आपणास करावयाचे आहे. या अभियानात सर्व प्रशिक्षकांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम करण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.
पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी विभागातील पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामध्ये तिसगाव प्रकल्पावरील उपसा पाणी वापर संस्थांना अल्ट्रासोनिक मिटर बसविण्याची धडक मोहीम सुरु केली. तसेच शासनाचे निर्णयानुसार पाणी वापर संस्थांचे दप्तराची तपासणी देखील सुरु करून त्यातील त्रुटी पाणी वापर संस्थांना कळवून त्याची पूर्तता करुन घेण्यात येत असल्याचे सांगितले. पाणी वापर संस्था सक्षम करावयाच्या असतील तर शासन व लाभधारक यांचा समन्वय करणे, सिंचन विभागावर जास्त लक्ष केंद्रित करणे, अभियंताच्या जास्तीत जास्त सहभाग वाढविणे, वाघाड च्या धर्तीवर उर्वरित प्रकल्पावर धडाडीने पावासं स्थापन करण्याची मोहीम हाती घेणे, पाणी वापर संस्था पदाधिकारी, सचिव प्रशिक्षण, वाल्मी / मेटा / यशदा या सारख्या संस्थात पावासं स्थापना व कार्यपद्धती बाबत चर्चासत्र / वर्कशॉप / प्रशिक्षणाबाबत मोहीम आखणे, *उपसा व बिगरसिंचन संस्थांना मीटरने पाणी मोजून देणे ई. अशाप्रकारे मोहिमा आखून पाण्याचा थेंबाथेंबाचा कार्यक्षम वापर करून कार्यवाही होणे अपेक्षित आहे, असे श्री. भागवत यांनी चर्चासत्रात विवेचन केले. विभागातर्गत पूर्वी सहकार कायद्या अंतर्गत पालखेड डावा कालवा व ओझरखेड कालव्यावर स्थापन झालेल्या पाणी वापर संस्था २००५ चे अंतर्गत वर्ग करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी सतरा वर्षांपूर्वी सिंचननामा नामक प्रकाशनाचे रोपटे लावून त्याची परंपरा पालखेड विभागाने जपली आहे. सदर सिंचननामा दरवर्षी दोन ऑक्टोंबर रोजी प्रकाशित केला जातो. जलसंपदा विभागामध्ये सिंचननामा प्रकाशित करणारा पालखेड पाटबंधारे विभाग हा एकमेव विभाग आहे. सद्यस्थितीत पाणी टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्यासंबंधी शासनाच्या ज्या काही योजना आहे, त्यांची माहिती आपण प्रविण प्रशिक्षक या नात्याने जनतेस करुन देणेचे आवाहन त्यांनी केले. पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी, सर्वात आधी जलसंपदा विभागामध्ये कार्यरत असलेले अभियंते यांना पाणी वापर संस्थां स्थापनेच्या दृष्टीने तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे. नवनियुक्त अभियंत्यांचा कल हा बांधकामापेक्षा सिंचन विभागाकडे वाढविणे गरजेचे आहे. लोकजागरातून जनतेत पाण्याची समज व उमज वाढण्यात निश्चितपणे मदत होईल असे प्रतिपादन करून श्री भागवत यांनी शेवटी बोलताना नमूद केले की, अंतिम उद्देश हाच असला पाहिजे की, “पिकांचे उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच पाणी वापर संस्थाचे माँडेल हे बिझिनेस माँडेल तयार झाले तरच शेतकरी हा लाभधारक न राहता सिंचनाचा भागधारक होईल* असे सांगून उपस्थितांसाठी सकारात्मक व भावनिक संदेश दिला.
श्री. वाघवकर यांनी त्यांनी लिहिलेले सहज आठवलं म्हणून हे पुस्तक तर श्री. भागवत यांनी सिंचननामा २०२४ हे श्री. पुसावळे यांचे कडे यशदासाठी सुपूर्द केले.
संचालक आंनद पुसावळे म्हणाले की,
श्री. देशमुख, वाघवकर व भागवत यांनी अतिशय तळमळीने पाणी वापर संस्थाबाबत चांगले प्रबोधन केले.श्री. भागवत यांच्या सारखा एखादा तरुण अधिकारी जेव्हा कार्यकर्त्याचे भूमिकेतून तळमळीने वेळ देऊन काम करतो, तेव्हा ते काम खऱ्या अर्थाने आदर्शव्रत बनते. शेवटी सर्वांना जलप्रतिज्ञा देऊन कार्यशाळेची सांगता झाली.