अहिल्यानगर/प्रतिनिधी
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या जयंतीच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरामध्ये रविवारी दि.२ मार्च रोजी सकाळी ८ ते १० यावेळेत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांसह एकूण ६७८ जणांनी सहभाग नोंदवला या स्वच्छता अभियानामध्ये एकूण ६.५ (साडे सहा) टन कचरा संकलित करून त्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली.
अहिल्यानगर शहरातील कापड बाजार रोड, पुना गाडगीळ पेट्रोलपंप ते कराचीवाला,चितळे रोड, महाराष्ट्र बँक ते आडते बाजार,नवी पेठ,शहाजीराजे रोड अशा तीन ग्रुपमध्ये वरील ठिकाणाहुन स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.सकाळी ८ ते १० यावेळेत हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यावेळी स्वच्छता अभियानासाठी लागणारे कुदळ,खोरे,घमेले,खराटे सारखे उपकरणे हातात घेऊन श्री सदस्य हे अभियान राबवत असतांना एकाग्र होऊन श्रमदान करतांना दिसत होते.सुमारे साडे पाच किलोमीटर पर्यंतचा रस्ता अभियानाद्वारे चकचकीत करण्यात आला.
स्वच्छता अभियान प्रसंगी श्री सदस्यांच्या हाती असलेला डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा बॅनर तसेच मास्क व हँड ग्लोज घालून स्वच्छता करणारे श्री सदस्य हे नगरकरांचे आकर्षण ठरले होते.
अहिल्यानगर शहरातील विविध परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या स्वच्छता अभियान प्रसंगी एकाग्र होऊन श्री सदस्यांसह इतर संस्थेचे स्वयंसेवक असे एकूण ६७८ जणांनी सहभाग नोंदवला. यावेळी महानगर पालिकेच्या वतीने कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी ट्रॅक्टर या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी झालेल्या स्वच्छता अभियानाच्या समारोप प्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आतापर्यंत राबवित असलेले उपक्रम व कार्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य हे कौतुकास्पद असून स्वच्छता अभियान सारख्या उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचे काम होत राहील अशी भावना व्यक्त करत त्यांनी जीवनात स्वच्छता दूत म्हणून सर्वांनी काम करावे असे आवाहन आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी यावेळी बोलतांना केले.