भेंडा/नेवासा
विद्यार्थी जीवनात स्वप्न ठेवली पाहिजेत, मात्र ती स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी मेहनत महत्वाची आहे असे प्रतिपादन नेवासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा शुभारंभ श्री.जाधव यांचे हस्ते झाला,त्यावेळी ते बोलत होते. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त माजी आ. पांडुरंग अभंग कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ, बबनराव भुसारी, प्रा. डॉ नारायण म्हस्के, शिक्षण संस्थेचे सचिव अनिल पं.शेवाळे, अंबादास कळमकर,डॉ.अशोकराव ढगे,रामकृष्ण नवले व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.जाधव पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन युवकांनी स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा अंगी बाळगावा. मोठ्या व्यक्तींचा आणि गुरुजनांचा आदर ठेवला पाहिजे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष प्रो. डॉ. संभाजी काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. अशोक सागडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष प्रा. केशव चेके यांनी आभार मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.