नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील नेवासा-शेवगाव मार्गावरिल रस्त्याचे मध्यापासून दोन्ही बाजूने १५ मीटर अंतरापर्यंतची अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाने हटविल्याने सुमारे ११५ दुकाने जमीनदोस्त होऊन भेंडयाची संपूर्ण बाजार पेठ उद्धवस्त झाली आहे. तर १५ दुकाने अंशत:बाधित झाली आहेत.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणे काढण्याच्या नोटीसा दिल्यानंतर सर्व दुकानदारांनी रस्त्याचे दोन्ही बाजूने बांधकाम विभागाने बांधलेल्या नालीवर असलेली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली हे अंतर ११ मीटर आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग १५ मीटर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यावर ठाम रहिल्याने येथील व्यावसायिकांनी दि. १४ फेब्रुवारी रोजी सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवून बसस्थानक चौकात आमरण उपोषण सूरु केले होते. मात्र दि.१५ रोजी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मध्यस्थि करून पालक मंत्र्यांशी बोलून तीन दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगीत करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही कोणताच तोडगा निघाला नाही. उलट पक्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने भोंग्याची गाडी फिरवून इशारा नोटिस देवून आता कोणतीही नोटिस न देता अतिक्रमने काढण्यात येणार आहे. सदर अतिक्रमने काढण्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम जमीन महसूल थकबाक़ी म्हणून सक्तिने वसूल करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी त्या त्या अतिक्रमणधारकावर असेल अशी तंबी दिल्याने व्यावसायिकांनी स्वत:हून बऱ्याच प्रमाणात दुकाने काढून घेतली होती.
बुधवार दि.५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बन्दोबस्तात उर्वरित अतिक्रमणे काढण्याची मोहिम राबविली.
त्यांनी प्रत्येक अतिक्रमणधारकाला
रस्त्याचे मध्यापासून १५ मीटर अंतराच्या खुणा करून दिल्या,त्यानुसार सर्वानी आपापले दुकाने काढून घेऊन रस्ता मोकळा केला.
सुमारे ५०ते ४५ वर्षा पासून असेलेली दुकाने भुईसपाट झाल्याने भेंडा गावची शान असलेली मुख्य बाजार पेठ काही तासामध्ये उद्धवस्त झाली. आपल्या नजरे समोर आपली दुकाने व निवारा उद्धवस्त होत असल्याचे पाहुन अनेक व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु दाटल्याचे दिसून आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता दुबाळे यांचे नेतृत्वाखाली अधिकारी-कर्मचारी यांनी ही मोहिम राबविली. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ससाणे व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.