माय महाराष्ट्र न्यूज:तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल देडगाव येथे ‘वयात येणाऱ्या मुलींना समजून घेताना’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सौ. अर्चना सोळंकी यांनी मार्गदर्शन केले. मुलींनी आपल्या माता-पित्यांशी मुक्त संवाद साधून विश्वास निर्माण करावा. असे मत सौ. अर्चना सोळंकी यांनी या प्रसंगी व्यक्त केले. यावेळी बोलताना सौ सोळंकी म्हणाल्या “सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे कुटुंबातील संवाद नष्ट होत चालला आहे. त्यामुळे किशोरवयीन मुली स्वतःला एकट्या समजत आहेत. त्यातून घर सोडून जाण्याचे प्रयत्न होताना दिसतात. त्यासाठी पालकांनी मुलींसोबत विश्वासाचे नाते निर्माण करून मुक्तपणे संवाद ठेवला पाहिजे. बेटी भाग मत जाना! असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तक्षशिलाच्या संचालिका सौ. शुभांगी कदम होत्या यावेळी बोलताना सौ. कदम म्हणाल्या ” ही कार्यशाळा अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. किशोर वयात मुलींना त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होणाऱ्या शारीरिक मानसिक व भावनिक बदलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्या गोंधळून जातात. या वयात त्यांना भावनिक आधाराची गरज असते. पालकांनी मुलींशी मैत्रीचे नाते ठेवल्यास ही गरज पूर्ण होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने एखादा तरी छंद जोपासला पाहिजे. त्यामुळे कठीण काळातुन सावरण्याची ऊर्जा मिळते, कोरोना काळात आपल्याला याचा प्रत्यय आला. या कार्यशाळेमध्ये
आई व मुलगी यांच्यातील संबंध, मुलींचे शिक्षण आणि करिअर, गुड टच आणि बॅड टच, मुलींची आत्मनिर्भरता, मुलींचे शारीरिक आरोग्य व सामाजिक पर्यावरणातील बदल अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी मन्वंतर संस्थेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. विजय कदम तक्षशिला जुनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक सर्व शिक्षक तसेच महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौ सुनीता वांढेकर यांनी प्रास्ताविक केले, अर्चना मडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शुभदा पागिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.