नेवासा
शेतकऱ्यांची कर्ज माफी करा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने दि. ११ रोजी रात्री १२ वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांनी दिली.
नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना दिलेल्या निवेदनात प्रहारने म्हंटले आहे की,महाराष्ट्र शासनाने निवडणुकीपुर्वी सर्वपक्षीय आमदारांनी त्या त्या पक्षाची निवडणुक जाहिरनाम्याव्दारे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले होते की आम्ही निवडुन आल्यानंतर शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करणार आहोत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा विचार करता आसमानी संकटानी शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे. महाराष्ट्रात दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा अहवाल सांगतो आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड यांच्या नुसार शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे सिध्द झालेले आहे.
अशी परिस्थिती असतांना विधानसभेमध्ये निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत अशी जनतेला साद घालुन निवडुन आलेले आमदार कर्ज माफीच्या संदर्भात चकार शब्द बोलत नाही. अथवा त्यांच्या पक्षाचे प्रमुख या संदर्भात भुमिका घेत नाही. यासाठी
११ एप्रिल ही शेतकऱ्याचा आसुड लिहिणारे शेतकऱ्याच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार लोकशाहीचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे.
या महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करुन देण्यासाठी गळ्यामध्ये निळी शाल व छत्रपतींचे नाव घेवुन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असतांना त्याच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेवुन
शेतकऱ्यांच्या कर्जामाफीसाठी विधानसभेत आवाज उठवावा म्हणुन आमदारांच्या निवासस्थाना समोर दि. ११ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजता शेतकऱ्यांच्या समस्येचा उजेड सर्व आमदारांना समजुन तो विधानसभेत पडावा यासाठी आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन अहिल्यानगर उत्तर मधील नेवासा, श्रीरामपुर, अकोले, राहाता, संगमनेर, कोपरगांव, या सर्व तालुक्यातील आमदारांच्या निवासस्थाना समोर होणार आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे,औताडे युवक जिल्हाध्यक्ष अड.पांडुरंग केशव,जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब दुस, तालुका संपर्क प्रमुख अरविंद आरगडे,नेवासा तालुकाध्यक्ष संदिप पाखरे ,
शहर प्रमुख रामहरी शिरसाठ यांच्या सह्या आहेत.