नेवासा
समाजातील विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांना पुरस्कार देणे ही खूप चांगली बाब असून मन्वंतर संस्था ही अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यास कारणीभूत ठरते त्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत असते असे प्रतिपादन अहमदनगर कॉलेजचे प्रा.डॉ.सतप्पा चव्हाण यांनी केले.
नेवासा तालुक्यातील देडगाव येथील
मन्वंतर सामाजिक संस्था संचलित तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल येथे मन्वंतर सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना मन्वंतर सामाजिक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी डॉ. चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सकाळचे बातमीदार रवींद्र सरोदे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार तसेच शिक्षण क्षेत्रात डॉ.अशोक कानडे व प्रा.तुषार अंबाडे तसेच दिव्यांग सुगम्यता क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल कृष्णा तवले यांना मान्यवरांच्या हस्ते मन्वंतर राष्ट्रीय पुरस्कार प्रधान करण्यात आले.
उद्योजक सुरेशराव शेटे, प्रा. डॉ. विजय कदम, सरपंच चंद्रकांत मुंगसे,शिक्षण संस्थेच्या संचालिका शुभांगी कदम, साहेबराव कदम व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. चव्हाण पुढे म्हणाले की, पुरस्कार घेणारे जसे हात असतात तसेच पुरस्कार देणारे हातही तेवढेच महत्त्वाचे असतात आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुरस्कार घेणाऱ्यांची व सर्व समाजाची एक बांधिलकी आहे की आपण पुरस्कार देणाऱ्यांचे हात बळकट केले पाहिजेत ती एक आपली जबाबदारी आहे विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात कशाप्रकारे बदल घडवता येईल व अशा प्रकारचे पुरस्कार मिळवता येतील व या देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून समाजात वावरता येईल अशी प्रेरणा घेऊन यापुढे वाटचाल करावी.
यावेळी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
डॉ.अभिषेक गडाख एमबीबीएस, डॉ आकांक्षा कदम बी ए एम एस परीक्षा उत्तीर्ण तर सत्यम पवार आरोग्य विभाग शासकीय नोकरीस निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तक्षशिलाच्या समन्वयक संकल्पना पवार,संजय कदम कृषी अधिकारी, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक व सर्व शिक्षक शिक्षिका, पालक व तक्षशिलाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.विजय कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ शुभदा पागिरे व सई कदम यांनी सूत्रसंचालन केले.प्राचार्य विठ्ठल कदम यांनी आभार मानले.