सांगोला
‘‘पूर्वी शेतीसाठीची सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकीकरण आणि शहरीकरणामुळे अलीकडे शेतीसाठी पाणी कमी उपलब्ध होत असल्याने, पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंचनासाठी वापर करणे आवश्यक झाले आहे. तसेच पाण्याचे व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर होईल, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे असे मत राज्याचे जलसंपदामत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
सांगोला महाविद्यालयात आयोजित २१ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या परिषदेत आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील, जलसंपदाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॅा. दी. मा. मोरे, सांगोला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड, बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार आदींची उपस्थिती होती.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, ‘‘राज्याची सिंचन क्षमता पूर्वी ३.८६ लाख हेक्टर होती, आता ती ५५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे, यात आणखी वाढ करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यासह पुराचे अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांना गती दिली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात राज्याची सिंचन क्षमता वाढवत नेताना, राज्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणे, हा आमचा प्रयत्न आहे,’’
विजेसाठी सोलर पॅनेलचा वापर यात फायद्याचा ठरतो आहे. उजनी धरणात वाळू आणि गाळ जमा झाल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे, याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल,’’ असेही ते म्हणाले.
जलसंपदाचे सचिव संजय बेलसरे यांनी सांगितले, की सांगोला तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. सिंचन व्यवस्थापनात आवश्यक बदल सूचवल्यास, त्या सूचना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सोडविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे आणि सांगोला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबूराव गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आणि जलसंपदाचे योग्य व्यवस्थापन हे महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
*स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन…
भारतीय हवामान खात्याकडून उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राद्वारे हवेतील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा आणि पर्जन्यमानाची माहिती पुण्यातील हवामान विभागाला पाठविली जाणार आहे, ही माहिती व त्या अनुषंगाने आवश्यक सूचना स्थानिक शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे पाठवण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.