नेवासा
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी आज काँग्रेस पक्ष व विविध संघटनाकडून नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने सत्ता आल्यास दोन महिन्याच्या आत शेतकऱ्याना कर्ज माफी करू अशी घोषणा केली होती, परंतु सहा महिने उलटून गेले, अर्थसंकल्पीय अधिवेशनही झाले परंतु यात शेतकऱ्यांच्या तोंडाला महायुती सरकारने पाने पुसली. कर्जमाफीचा ‘क’ देखील उच्चारायाला सरकार तयार नाही. उलट उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी ३१ मार्चच्या आत कर्ज भरा अशी धमकीच दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने राज्यभर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
महायुती सरकारचा निषेध करत नेवासा तहसील कार्यालय येथे काँग्रेस कमिटी व विविध संघटनांनी नेवासा तहसीलदार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे असे निवेदन दिले.
यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंत्यत जिव्हाळ्याचा शेतकऱ्यांची कर्जमाफी विषय बाजूला ठेवत औरंगजेब कबर काढण्यासारखे मुद्दे उकरून काढत सरकारने सर्वाना वेडयात काढले. कर्जमाफीचा ‘क’ सुद्धा यांनी अधिवेशनात काढला नाही.
नेवासा शहराध्यक्ष अंजुम पटेल म्हणाले, कर्जमाफी सोडाच महायुतीचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जाचे पैसे घेऊन शेतकरी लग्न, साखरपुडे यात उडवतात,पीक विम्याचा उल्लेख करत शेतकऱ्यांना भिकारी संबोधतात अशा कृषी मंत्र्याचा व सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत.
गणपत मोरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या वाढत चालल्या असून यास जबाबदार खोट्या घोषणा करणारे सरकार आहे.
नेवासा तहसीलदार यांना निवेदन देत संपूर्ण कर्जमाफी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पटारे, गुलाब पठाण, बसपाचे हरीश चक्रनारायण,संजय वाघमारे, वसंत आगळे, संतोष साळवे, बाळासाहेब बेहळे,नारायण मते, असिफ पटेल, कैलास बोर्डे आदिसह शेतकरी उपस्थित होते.