नेवासा
शिक्षणातील आरक्षणामुळे अनेकजण उच्च शिक्षीत होऊन उच्च पदावर विराजमान झाले. कुटूंब व त्यांची अर्थव्यवस्थाही सुधारली. त्यामुळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आ. विठ्ठलराव लंघे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास आ.विठ्ठलराव लंघे यांनी काल सोमवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे, सोनई पोलीस ठाण्याचे एपीआय माळी, रवि आल्हाट, पप्पु आल्हाट यावेळी उपस्थित होते.
आ.विठ्ठलराव लंघे पुढे म्हणाले की, महामानव डॉ. आंबेडकरांनी गोरगरीबांना सन्मानाने जगण्याचा अधिकार राज्यघटनेच्या माध्यमातून दिला आहे. शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, हा महामंत्र देखील त्यांनीच दिलेला आहे. राजकारणातील आरक्षणामुळे समाजातील अनेक प्रश्न सुटायला मदत झाली.
यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक समितीच्या जयंती उत्सव वतीने येथील शनि चौकात अर्धपुतळा अभिवादनासाठी ठेवला होता. सायंकाळी पाच वाजता मिरवणूक काढण्यात आली होती. असंख्य डॉ. आंबेडकर प्रेमींनी मिरवणूकीत सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन शिरसाठ, संतोष लोंढे, बबलू लोंढे, राजू ठुबे, अचानक आंग्रे, निलेश शिरसाठ यांनी परीश्रम घेतले.
दरम्यान डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्रा मार्फत थंड पाणी व सरबताचे मोफत वाटप करण्यात आले. मागील दहा वर्षापासून हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ चौगुले राबवतात. संगोपन केंद्रात अनाथ, गरीब मुले सांभाळून डॉ. आंबेडकर यांच्यावर असलेल्या निष्ठेमुळे हा उपक्रम राबवित आहे.