नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि भक्तांच्या मागणीनंतर अखेर नेवासा एसटी आगाराच्या वतीने श्रीक्षेत्र देवगड ते पंढरपूर विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. श्री देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
या बस सेवेची अनेक दिवसांपासून भाविक-भक्तांकडून मागणी होती. ती प्रत्यक्षात येताच वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पंढरपूर दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमामुळे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचं विशेष कौतुक होत आहे. जनतेच्या मागणीनुसार काम करताना त्यांनी दाखवलेली तत्परता आणि भक्त भावनेला दिलेला आदर यामुळे त्यांच्याबद्दल भाविकांमध्ये समाधान आणि कृतज्ञतेची भावना आहे.
तसेच ही बस पूर्वरत चालू करण्यासाठी नेवासा तालुका प्रवासी संघाचे वतीने अनिल ताके यांनी ही राज्य परिवहन महामंडळाच्या विभागाचे नियंत्रक व विभागाचे वाहतूक अधीक्षक यांच्या समक्ष भेटी घेऊन वेळोवेळी पाठपुरावा करीत बस स्थानक बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे एस. टी. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला होता.महामंडळाने आंदोलन स्थगित करा ही विनंती करीत सदर बस दि. 22 जून 25 रोजी चालू करण्याचे लेखी पत्र आम्हाला दिले होते,त्यानुसार आज या बस चा प्रारंभ श्री क्षेत्र देवगड येथे करण्यात आला.या भागातील भाविकांच्या भावना लक्षात घेऊन प्रवासी संघटनेने दिलेल्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक,व विभागीय वाहतूक निरीक्षक यांनी सदर बस सुरू करण्याचे लेखी पत्र देऊन आज प्रत्यक्ष कार्यवाही केल्याबद्दल अनिल ताके याांनी महंडाळच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रवासी भाविकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून आभार मानले.