मुंबई
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७२ वा वर्धापनदिन मंगळवार दि.१ जुलै रोजी राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्रांत उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम कामगार क्रीडा भवन प्रभादेवी मुंबई येथे संपन्न झाला. कामगार कल्याण आयुक्त मा.श्री.रविराज इळवे यांच्या हस्ते सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर सायंकाळी दीपप्रज्वलनाने सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री.इळवे यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच मंडळाने अलीकडच्या काळात सुरु केलेल्या आर्चरी, रायफल शुटिंग या उपक्रमांसह अद्ययावत अभ्यासिका, व्यायामशाळा, टेबल टेनिस, जलतरण तलाव इत्यादी सुविधांचा कामगार व कामगार कुटुंबियांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. मंडळाच्या वाटचालीत शासन, लोकप्रतिनिधी, कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, आणि पत्रकारांचे योगदान मोलाचे असल्याचे श्री.इळवे यांनी नमूद केले.
वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीन गडकरी, कामगार मंत्री मा.ना.अॅड. आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री मा.ना.अॅड.आशिष जयस्वाल यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे, शाहीर श्री.मधुकर खामकर, कवी श्री.विसुभाऊ बापट, ज्येष्ठ कामगार कलावंत श्री.सत्यवान धुरी, लावणी सम्राज्ञी श्रीमती सुरेखा काटकर, शाहीर श्री.कमलाकर पाटील, श्री.रवींद्र पारकर, सिने-नाट्य कलावंत श्री.राम काजरोळकर, श्री.प्रकाश बाडकर, हाफकिनचे कामगार अधिकारी डॉ.अमित डोंगरे, गुणवंत कामगार संघटनेचे श्री.दिलीप खोंड, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्री.बजरंग चव्हाण, रायफल शुटींग प्रशिक्षक श्री.विश्वजित शिंदे, जिमनॅस्टिक्स प्रशिक्षक श्री.अजित शिंदे, टेबल टेनिस प्रशिक्षक श्री.परेश मुरकर आदी मान्यवर देखील मंडळास शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित होते.
तसेच उपकल्याण आयुक्त श्री.महेंद्र तायडे, श्रीमती माधवी सुर्वे, श्री.नंदलाल राठोड, लेखा व लेखा परीक्षा अधिकारी रवी टोम्पे, सहायक कल्याण आयुक्त डॉ.घनश्याम कुळमेथे, विधी अधिकारी श्री.जितेंद्र पाटील, प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी श्री.मनोज बागले यांच्यासह मंडळाचे आजी-माजी कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.