नेवासा/प्रतिनिधी
सोनई, ता. नेवासा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे वतीने ‘डिजिटल युगातील पत्रकारिता आणि मूल्यांची पुनर्स्थापना’ या विषयावर विचारमंथन घडवून आणण्यासाठी मीडिया संमेलनाचे आयोजन शनिवार, दि. १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले असल्याची माहिती बी.के.उषा दीदी यांनी दिली.
पत्रकारिता ही समाजाचे दर्पण मानली जाते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात पत्रकारितेचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले असून, ‘पेन ते पेनलेस पत्रकारिता’ या प्रवासात पत्रकारितेतील शाश्वत मूल्य हरवत चालल्याची जाणीव या संमेलनात व्यक्त होणार आहे. त्यामुळे या मूल्यांचे पुन्हा पुनर्स्थापन करणे काळाची गरज ठरत आहे.
या संमेलनासाठी मीडिया प्रभाग, राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू (राजस्थान) तर्फे ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी (राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग) आणि प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे (मीडिया प्राध्यापक व महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक, जळगाव) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
संमेलनासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर, सोशल मीडिया, जनसंपर्क, जाहिरात क्षेत्र तसेच मीडिया शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या विचारमंथनात सहभागी होण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी उषा दिदी,
संचालिका, ब्रह्माकुमारी सेवाकेंद्र, सोनई यांनी केले आहे.