नेवासा
राशिनमध्ये महात्मा फुले फलकाची विटंबना करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सावता परिषद व समता परिषदेने केली आहे.
कर्जत तालुक्यातील राशिन ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फलकाची काही समाजकंटकांनी २ ऑगस्ट रोजी
विटंबना केली. या विरोधात सावता परिषदेच्या वतीने तसेच सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज दि.६ ऑगस्ट रोजी नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील ,नेवासा तहसीलदार संजय बिरादार व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रभर महात्मा फुले यांचे विचार पुसण्याचा प्रयत्न काही जातीयवादी घटकांकडून सातत्याने होत आहे. अशाच प्रकारे २०१४ साली राशिन ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावानुसार गावातील चौकात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या फलकाची नुकतीच तोडफोड व विटंबना करण्यात आली. यामुळे राज्यभरातील अनुयायांच्या भावना दुखावल्या असून, समाजात प्रक्षोभ निर्माण झाला आहे. दोषींवर त्वरित मोका अंतर्गत कठोर कारवाई करावी,जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी,अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
निवेदन देते वेळी प्रदेश महासचिव राहुल जावळे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुलसौदर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन दरवडे,नेवासा तालुकाध्यक्ष शरद तांबे,सोशल मीडिया प्रमुख ऋषिकेश तुपे, सागर पुंड ,संदिप पुंड,अरूण फुलसौदर,दिनेश व्यवहारे, प्रदिप वडगे ,संतोष दरवडे, प्रदिप वडगे, महादेव पुंड, बाबासाहेब गायकवाड, माऊली कन्हेरकर, कैलास गवळी ,बाबासाहेब,सतिश सरोदे, तसेच सावता परिषद व समता परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.