नेवासा/प्रतिनिधी
निसर्गाचा ऱ्हास केल्याचे भोग आता भोगावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी,” असा अजब सल्ला देणारे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणारे असल्याची तिखट प्रतिक्रिया कृषि शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी व्यक्त केली.
धाराशिवच्या दौऱ्यावर दौऱ्यावर असताना केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की,
३६५ दिवसांपैकी ३३२ दिवस शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाचा ऱ्हास केल्याचे भोग आता भोगावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी.शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक संकटांसाठी कायम तयार राहावं. “अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही,” असं म्हणत त्यांनी मदतीबाबत झटकले.
सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे नवीन वादाला फोडणी मिळाली आहे. नेवासा तालुक्यातील बाबासाहेब सरोदे या शेतकरयाने ‘‘सरकारने साथ दिली नाही,’’ असे म्हणत हताशपणे मृत्यूला कवटाळची घटना ताजी असतानाच पाशा पटेल यांच असं असंवेदनशील विधान शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळणारे आहे.
राज्यात मोठी आपत्ती आल्यावर महाराष्ट्र राज्याने केंद्र सरकारची आर्थिक मदत घेणे आवश्यक आहे, तसेच निसर्गाने फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान केले आहे हे सर्व मागील कर्माची फळे कशी असू शकतात याचाही खुलासा पटेल यांनी करावा. शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्यासाठी शेतीमधील आर्थिक दुरावस्था सुधारण्यासाठी फार मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. यासाठी अभ्यास प्रयत्न व त्यातून मार्ग काढणे हा चिंतनाचा विषय आहे असेही डॉ. अशोकराव ढगे म्हणाले.