नेवासा/प्रतिनिधी
नेवासा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी ऐन पोळ्याच्या दिवशी तालुक्यातील शेतकरी व पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा भेटी घेवून त्यांच्या कामाचे कौतुक करत गौरव ही केला.
पंचायत समिती म्हणजे गावाकडच्या मातीशी अन् बळी राजाशी नाळ जोडलेले कार्यालय याची जाणीव ठेवत नेवासा पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी संजय लखवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी पुत्र असलेले सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी पोळ्याच्या सणानिमित्ताने वर्षभर पशुसेवा करणाऱ्या पशुपालक, शेतकरी बळीराजा, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करुन कृतज्ञता व्यक्त केली.
श्री.पाटेकर यांनी बेलपिंपळगाव येथील शिंदे वस्तीवर जाऊन सर्जा-राजा बैलजोडीची पूजा करुन बळीराजांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त करत शिंदे कुटुंबासमवेत पुरणपोळीचा आस्वाद घेतला. यावेळी भाऊसाहेब शिंदे,दादासाहेब शिंदे,आबासाहेब शिंदे, सुहास मिरपगार उपस्थित होते.पाटेकर यांनी ग्राम दैवत रोकडोबा हनुमानाचे दर्शन घेतले. सरपंच किशोर गारुळे,माजी सरपंच कृष्णा शिंदे, चंद्रशेखर गटकळ बाळासाहेब शिंदे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर पोलीस पाटील संजय साठे यावेळी उपस्थित होते.
कुकाणा येथील पशु चिकित्सालयात
जाऊन पशु सेवेतील उत्कृष्ट सेवेबद्दल पशुधन विकास अधिकारी डॉ.मनोज शिंदे व व्रणोपचारक संजय म्हस्के, परिचर बाळासाहेब हिवाळे यांचा पाटेकर यांनी सन्मान केला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब आगळे उपस्थित होते.
रस्तापुर येथील हारकळ वस्तीवर नैसर्गिक सेंद्रिय शेती करणारे दत्तात्रय शेरकर व सुंदरदास हारकळ या शेतकरी बळीराजांचा पाटेकर यांनी सन्मान केला. तसेच त्यांच्याकडून नैसर्गिक शेती बद्दल माहिती घेतली.
पंचायत समितीचे वतीने अचानक झालेल्या गौरवामुळे पशुपालक शिंदे, नैसर्गिक शेतीतज्ञ शेरकर व हारकळ कुटुंबीय, पशुदवाखान्यातील डॉक्टर व कर्मचारी भारावून गेले.
*प्रतिक्रिया…
सर्जा-राजा बैल-जोडी २२ वर्षापासून कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहे. ४ वर्षापूर्वी वरघुडे वस्ती बेलपिंपळगाव येथील रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त मिरवणुकीत सर्जा-राजा बैलजोडीच्या रथाचे सारथ्य भास्करगिरी महाराज व सुनीलगिरी महाराज यांनी केले होते.
सर्जा-राजा मुळे शेती व कुटुंबाची भरभराट झाली. सहायक गटविकास अधिकारी पाटेकर यांची भेट आनंददायी वाटली.
-भाऊसाहेब गोविंदराव शिंदे
शेतकरी,बेलपिंपळगाव