शिर्डी, दि. ४
देशात औद्योगिक गुंतवणुकीला मोठे प्रोत्साहन मिळत असून, उद्योगांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी आपल्या अभ्यासक्रमांची व्यापकता वाढविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ‘साईबाबा रूरल इन्स्टिट्यूट’मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस श्री.विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी विविध विभागांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, सध्या राज्यात सौर ऊर्जा प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. ‘सौर ग्राम’ प्रकल्पांची वाढती संख्या आणि या क्षेत्राचा वेग पाहता, भविष्यात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळाची गरज भासणार आहे. ही गरज ओळखून संस्थांनी त्यापद्धतीचे अभ्यासक्रम तयार करावेत. तसेच, यामध्ये विद्यार्थिनींनाही प्रशिक्षणासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी संस्था चालकांना दिल्या.
राज्यशासनाने कौशल्य विकासाला गती दिली असून, ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ योजनेसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवरा शिक्षण संस्थेने या योजनेत पुढाकार घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीच्या (प्लेसमेंट) संधी उपलब्ध झाल्याबद्दल श्री.विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यातील औद्योगिक विकासाविषयी माहिती देताना ते म्हणाले , शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) नवीन उद्योग सुरू होत असून, यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. तसेच, औद्योगिक विकासासाठी राहुरी कृषी विद्यापीठाची जागा उपलब्ध करून घेण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवकालीन तोफेच्या प्रतिकृतीचे कौतुक : या भेटीदरम्यान, संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शिवकालीन तोफेच्या प्रतिकृतीची आणि त्याच्या प्रात्यक्षिकाची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. बिबट्यांच्या वावरामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून, बिबट्यांना हुसकावून लावण्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले.


