अहिल्यानगर/प्रतिनिधी
वैज्ञानिक दृष्टिकोनाला जीवनाच्या मूल्याशयांची जोड दिली की विवेक निर्माण होतो आणि हाच विवेकाचा विचार जर व्यक्ती व समाजाच्या आचारात आला तर व्यक्तीच्या आणि एकूणच समाजाच्या जीवनातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे सोपे होते. म्हणून विवेकशील वर्तन हाच अंधश्रद्धा निर्मूलनाचा मुख्य उपाय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेची जिल्हा बैठक रविवार दि.८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राज्य सल्लागार कॉ. बाबा आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली शार्दुल नर्सरी येथे संपन्न झाली त्यावेळी डॉ. गोराणे बोलत होते.महाराष्ट्र अंनिसचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत,कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड, शहर कार्याध्यक्ष भारतभूषण भागवत, जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा, बी .के. चव्हाण, दिपक शिरसाठ, छाया बंगाळ ,प्रा किसन माने प्रमोद भारूळे, बबनराव धावणे आदी विचारमंचावर उपस्थित होते.
डॉ.गोरणे पुढे म्हणाले की, व्यक्तीच्या व समाजाच्या जीवनात शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे अपेक्षित होते. पण तसे पुरेशा प्रमाणात झाले नाही. त्यामुळे आज समाजात अंधश्रद्धा वाढताना दिसतात. यासाठी तरुण -तरुणी आणि विशेषतः महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला स्वतःहून जोडून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अंनिसचे जिल्हाअध्यक्ष बाबासाहेब बुधवंत म्हणाले की, अलीकडच्या काळात भोंदूगिरीचे स्वरूप बदलले आहे. भोंदूना कायद्याचा धाक वाटलाच पाहिजे. चाप बसला पाहिजे.त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागरूक राहून, भोंदूगिरीबाबत पोलिसांना वेळोवेळी माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कॉ.बाबा आरगडे यांनी समाज सुधारकांनी केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचे उदाहरणे देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीच्या प्रारंभी चळवळीचे गीत होऊन, सर्वांचे स्वागत व परिचय झाला. त्यानंतर तालुका निहाय अहवाल वाचन झाले. कर्जत तालुका अहवाल वाचन हरिश्चंद्र काळे, पाथर्डी तालुका अहवाल मल्हारराव खेडकर, शेवगाव तालुका अहवाल चिमाजी धनवडे, कोपरगाव तालुका अहवाल दिपक शिरसाठ, नेवासा तालुका व भेंडा शाखा अहवाल आप्पासाहेब वाबळे, पारनेर तालुका व कान्हूरपठार शाखा अहवाल कैलास लोंढे, अहिल्यानगर शहर शाखा अहवालाचे भारतभूषण भागवत यांनी वाचन केले. जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचा वार्षिक आढावा मांडला.
पुढील आठवडा भरात प्रत्येक शाखेमध्ये नवीन सभासद नोंदणीसाठी अभियान राबवणे, त्यानंतर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक शाखेची शाखा कार्यकारिणीची निवड करणे, प्रत्येक शाखेत राष्ट्रीय विज्ञान दिन नाविन्यपूर्ण उपक्रम , कार्यक्रम घेऊन साजरा होईल, याचे नियोजन करण्याचे ठरले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक जूनच्या पहिल्या आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यात होणार आहे.त्याबाबतचे नियोजन आत्तापासूनच करण्याचा निर्णय झाला. यावेळी कोपरगावचे दैनिक जनता आवाजचे संपादन बिपिन गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच “सौदाळे गावाने जात सोडली” ग्रामपंचायतने या ऐतिहासिक घेतलेल्या निर्णयाचे स्वागत सौंदाळे गावात जाऊन करण्याचे ठरले. याशिवाय
अंनिसचे कायदे विषयक सल्लागार
अड. अभय राजे यांनी निसर्गरम्य परिसरातील हाॅल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
या जिल्हा बैठकीसाठी चिमाजी धनवडे, कैलास लोंढे,शब्बीरभाई पठाण, बाळू भैलमे , हरिश्चंद्र काळे, मेघा झावरे, मल्हारी खेडकर, अमोल भांडेकर, आशाताई चव्हाण, बिपीन गायकवाड, खिवराज दुशिंग, आप्पासाहेब वाबळे, काॅ.भारत आरगडे, वसंत जगधने, प्रमोद लांडे, संदीप शिंदे, रामनाथ भुजाडे, भाऊसाहेब एडके, पुष्पा आरगडे, रेणूका चौधरी, अनिता सापा, संकेत शिंदे, प्रतिक ठोकळ आदी नऊ शाखांचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक ताकपेरे, ललीत भारूळे, भावना भारूळे यांनी विशेष प्रयत्न केले.
विनायक सापा यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब बुधवंत यांनी आभार मानले.
हम होंगे कामयाब या गीताने बैठकीचा समारोप झाला.


