नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तसेच रामायणकालीन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आधुनिक डिजिटल संग्रहालय (Digital Museum) उभारण्यासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार वाकचौरे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे कडे केली आहे.
खासदार वाकचौरे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळीच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची रचना केली होती. तसेच येथे असलेले मोहिनीराज मंदिर हे भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराशी संबंधित प्रसिद्ध मंदिर असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
याशिवाय रामायणकालीन परंपरेशी संबंधित असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या स्थळांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. त्यामध्ये अकोले (अगस्त्य आश्रम) जिथे भगवान श्रीरामांना अमोघ बाण प्राप्त झाला होता. कोपरगाव जिथे भगवान श्रीरामांनी राजा दशरथ यांचे श्राद्ध केले होते. तसेच धांडरफळ (ता. संगमनेर) जिथे धान्य ऋषर्षीच्या आश्रमात भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली होती. अशा प्राचीन व धार्मिक महत्त्वाच्या स्थळांचा समावेश आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या नेवासा तसेच रामायणकालीन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आधुनिक डिजिटल संग्रहालय (Digital Museum) उभारण्यासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार वाकचौरे पत्र देऊन तसेच लोकसभेत तारांकित प्रश्न उचलून यांनी केली आहे.
यावर उत्तर देतांना केन्द्रीय पर्यटन मंत्र्यांनी या स्थळांच्या देखभालीसाठी करण्यात आलेला मागील तीन वर्षात वर्ष २०२२-२३ साठी रु. ६,३५,४१२ रुपये, वर्ष २०२३-२४ साठी रु. ३,२१,२६८ रुपये, वर्ष २०२४-२५ साठी रु. २,५९,४९२ रुपये तर
वर्ष २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंतं २,९०,४१४ रुपये इतका खर्च करुन या स्थंळांचे जतन करण्यात येत असल्याचे सांगितले.
नेवासा या तीर्थक्षेत्राचा स्वदेश दर्शन योजना किंवा प्रसाद योजना अंतर्गत समावेश करून ते महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे पैठण व शिर्डी यांच्याशी जोडण्याचा विचार करावा. ज्यामुळे या भागातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या सर्व स्थळांचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून त्यांना नाशिक (पंचवटी) सोबत जोडत रामायण सर्किटमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणीही खासदार वाकचौरे यांनी केली आहे. तसेच या पवित्र स्थळांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून या स्थळांचे संवर्धन होईल आणि देश-विदेशातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.
केंद्र सरकारच्या सहकार्याने नेवासा व रामायणकालीन स्थळांचा विकास झाल्यास या परिसरातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक महत्वप्राप्त नेवासा तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबतच्या श्री वाकचौरे यांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना केन्द्रीय पर्यटन मंत्री गजेन्द्र शेखावत यांनी सांगितले कि, अहिल्यानगर येथील नेवासा परिसरातील लाडमोड टेकडी जेथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमदभगवतगीतेवर प्रसिध्द प्रवचन दिले होते या स्थळाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून पुरातत्व स्थळ व अवशेष अधिनियम १९५८ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे.
राज्यातील तीर्थक्षेत्रांचा पर्यटन विकास व देखभालीची मुख्य जबाबदारी संबंधित राज्य सरकाराची असली तरी केन्द्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारांना पर्यटन विकासासाठी सहकार्य करत असल्याचे ही मंत्री श्री शेखावत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकार कडून नेवासा तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केन्द्र सरकारकडे अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही मात्र महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन विकास प्रकल्पासाठी केन्द्र सरकारने सुमारे रु. ४३७.१० कोटीची मंजूरी दिली आहे.
खासदार भाउसाहेब वाकचौरे यांनी संसदेत नेवासा तीर्थक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करुन याबाबत सरकारचे लक्ष वेधल्यामुळे नेवासा येथील ऐतिहासिक, सांस्कृतिके व धार्मिक महत्वाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे तसेच भविष्यात नेवासा तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विकासासाठी केन्द्र व राज्य सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जातील अशी आशा ही खा. वाकचौरे यांनी व्यक्त केली.


