अहिल्यानगर/प्रतिनिधी
नगर येथील वाचन संस्कृती व महिला सबलीकरण चळवळीतील कार्यकर्त्या सौ.बेबीताई अशोक गायकवाड
यांना महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालया कडून देण्यात येणारा सन २०२४-२५ या वर्षीचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जाहीर झाला आहे.मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ सायं.५ वाजता मुंबईत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सौ.गायकवाड यांना पाठिवलेल्या पत्रात म्हंटले आहे की,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची आणि सामाजिक समतेची जी मशाल पेटवली. तोच वारसा आपल्या कार्यातून पुढे नेणाऱ्या महाराष्ट्रातील रणरागिणींचा गौरव करताना महाराष्ट्र शासनाला सार्थ अभिमान आहे.
अत्यंत आनंदाची बाब अशी की, आपण विधवा सक्षमीकरण, वंचित बालकांचे पालकत्व, अनिष्ट रुढींचे निर्मूलन या क्षेत्रात जे निरलस, त्यागमय आणि व्रतस्थ कार्य केले आहे, त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे आपणास ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ (सन २०२४-२५) जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक महसूल विभागातून आपली या सर्वोच्च सन्मानासाठी झालेली निवड, आपल्या अविरत सेवेची पावती असून ती संपूर्ण समाजासाठी भूषणावह आहे. आपल्या या दैदीप्यमान यशाबद्दल शासन आणि उच्च शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन.
या पुरस्काराचा वितरण सोहळा ना. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ सायं.५ वाजता सर सिताराम तथा लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह (पाटकर हॉल), श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई- ४०००२० येथे आयोजित केला आहे. आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे, यासाठी हे सस्नेह निमंत्रण.


