नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील पांढरीपुल औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलिस चौकी करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठवण्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी येथे दिली.
तसेच या औद्योगिक क्षेत्राचा सुरळीत पाणीपुरवठा व येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याबाबतही संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतीच पांढरी पुल(नेवासा) एमआयडीसी येथील गॅलेक्सी लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगास भेट दिली व या उद्योगाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. या उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. आशिया यांनी
एमआयडीसीतील उद्योजकांशीही संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीस गॅलेक्सी लॅबोरेटरीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत देशमुख व संचालक पियूष कोटेचा यांच्यासह व्हीआरएस फूड आणि पॉवर लाईट या उद्योगांचे प्रतिनिधी, नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक बंडू डमाळे, पाणीपुरवठा व्यवस्थापक एकनाथ कराळे, सिव्हिल विभागाचे अशोक माचे व दादासाहेब तुपे उपस्थित होते.
औद्योगिक युनिट्सच्या प्रतिनिधींशी झालेल्या या बैठकीत पांढरीपुल औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्या मांडण्यात आल्या. प्रामुख्याने पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी, जसे की पाण्याची कमतरता, गळती, टँकरवरील अवलंबित्व तसेच दाब व्यवस्थापन याबाबत चर्चा करण्यात आली. पाणी मुळा धरणातून घेतले जात असल्याची माहिती देण्यात आली व यासंदर्भातील सुधारणा कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्देही उपस्थित करण्यात आले. विशेषतः सेवा रस्त्याची खराब अवस्था, खड्डे आणि त्यामुळे जड वाहनांच्या वाहतुकीस होणारा त्रास याकडे लक्ष वेधण्यात आले. याबाबत पूर्वी एमआयडीसी असोसिएशनकडे निवेदन देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रीट लाईट्सची गरज आणि नियमित पोलिस गस्त वाढविण्याची आवश्यकता यावरही चर्चा झाली. उशिराच्या वेळेस काम करणार्या कर्मचार्यांना सुरक्षिततेबाबत अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत जवळपास आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येतात. यामुळे औद्योगिक क्षेत्रात आरोग्य केंद्राची गरज मांडण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सर्व मुद्यांची नोंद घेऊन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्यात येतील तसेच पुढील काही दिवसापासून पोलिस गस्त सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पोलिस चौकी स्थापन करण्याबाबत प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल व आरोग्य केंद्र उभारणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान जिल्हा प्रशासनाने औद्योगिक क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करून आवश्यक पायाभूत सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्याबाबत बांधिलकी स्पष्ट करताना दीर्घकालीन उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबविण्याची ग्वाही देताना प्रशासनाकडून सातत्यपूर्ण सहकार्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, गॅलेक्सी लॅबोरेटरीजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत देशमुख हे उत्कृष्ट लेखक असून भगवद् गीतेवर सुंदर भाष्य त्यांनी केले आहे. त्याची माहिती डॉ.आशिया यांना दिल्यावर त्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. त्यानंतर त्यांनी उद्योग परिसराची पाहणी करून येथील औद्योगिक उत्पादनाचीही माहिती घेतली. यावेळी डॉ. आशिया यांच्या हस्ते कंपनी आवारात वृक्षारोपण करण्यात आले.



