Sunday, April 19, 2026

गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचा अपमान कदापीही सहन केला जाणार नाही-अब्दुलभैय्या शेख

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे पूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्याविषयी वाचाळवीर विकास लवांडे याने केलेले बेजबाबदार, खालच्या पातळीचे आणि समाजात तेढ निर्माण करणारे विधान हे अत्यंत संतापजनक व निषेधार्ह आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून लवांडे यांनी केवळ एका महान संतपुरुषाचा अपमान केलेला नाही, तर संपूर्ण समाजाच्या भावना दुखावण्याचे पाप केले आहे.गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचा अपमान कदापीही सहन केला जाणार नाही असा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा गट) युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी दिला.

श्री.शेख पुढे म्हणाले की, नेवासा तालुक्यातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांनी देखील या व्यक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध नोंदवून सामाजिक ऐक्याची भक्कम परंपरा जपली आहे. आज सर्व धर्म, सर्व जाती आणि सर्व समाज एकत्र येऊन भास्करगिरी महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे. महाराजांविषयी असलेला आदर हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून सर्व समाजाच्या हृदयात खोलवर रुजलेला आहे. भास्करगिरी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांनी कधीही जाती-धर्मात फूट पाडणारे किंवा कोणत्याही समाजाला कमी लेखणारे वक्तव्य केलेले नाही. उलट, त्यांनी नेहमीच प्रेम, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दिला आहे. अशा निष्कलंक आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वावर आरोप करणे म्हणजे अज्ञानाचा कळस आहे.
विकास लवांडे यांने जाणीवपूर्वक खोटे आरोप करून समाजात विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे. हे कृत्य मुळीच खपवून घेतले जाणार नाही. अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी, ही आमची ठाम आणि आक्रमक मागणी आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आम्ही पत्राद्वारे गृहखात्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) च्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
आज जर अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष केले, तर उद्या समाजात अराजकता निर्माण होईल. त्यामुळे अशा प्रवृत्तीला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. भास्करगिरी महाराजांसारख्या संतपुरुषाचा अपमान सहन केला जाणार नाही, हे आम्ही स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो.

अशा थोर आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे—त्याचा परिणाम करणाऱ्यावरच होणार आहे. त्यामुळे विकास लवांडे यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवू. असा इशारा अब्दुल भैय्या शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!