अहिल्यानगर, दि. ११
न्यायप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवून “न्याय आपल्या दारी” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयामार्फत ‘समाधान समारोह’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रारंभ दि. २१ एप्रिल २०२६ पासून झाला असून दि. २१, २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष लोकअदालतीत या उपक्रमाचा समारोप होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व वकील, पक्षकार तसेच संबंधित हितधारकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून वादांचे प्रभावी निवारण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिवाजी कचरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले आहे. या विशेष लोकअदालतीमध्ये पक्षकारांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच आभासी पद्धतीने (ऑनलाईन) सहभागी होण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा संमती-आधारित प्रक्रियेद्वारे सलोख्याने व जलद निपटारा करणे, हा या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून पक्षकारांना दीर्घकालीन न्यायप्रक्रियेतून दिलासा मिळून परस्पर सहमतीने वाद मिटविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली जिल्ह्यातील एकूण २४ प्रकरणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर येथे आयोजित विशेष लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि ज्यांना ती परस्पर संमतीने मिटविण्याची इच्छा आहे, अशी प्रकरणे देखील विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येणार आहेत.
याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहिल्यानगर तसेच तालुका विधी सेवा समिती संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, कर्जत, जामखेड आणि अकोले येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा ८५९१९०३६१६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा dlsanagar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


