Saturday, September 12, 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना ग्रॅच्युइटी देण्याबाबत शासन सकारात्मक

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई/प्रतिनिधी

पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, समाजातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना उपदान (ग्रॅच्‍युइटी) देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. यंदाचा पोषण माह ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, सहआयुक्त संगिता लोंढे, विजय क्षीरसागर, आयुषचे सहायक संचालक सुश्रृत मुक्कावार यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, पोषण माहाच्या माध्यमातून बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आहार व आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास, आरोग्य आणि आयुष विभागाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी जन्मापासूनच योग्य पद्धतीने शिशु अभ्यंग मिळणे आवश्यक असून, त्यांचे महत्व मातांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष विभागाचा सहभाग घेण्यात आला आहे. आयुषच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आवश्यक मार्गदर्शन देऊन ही माहिती मातांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

यंदाच्या ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनवर आयुष विभागाने तयार केलेले आरोग्य व पोषणविषयक व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत आणि त्यातील माहिती गरोदर व स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

मुंबईतील ८१७ अंगणवाड्या होणार सक्षम
सक्षम अंगणवाडी प्रकल्प योजनेअंतर्गत स्नेहा सामाजिक संस्था आणि एकात्मिक बालविकास सेवा यांच्यात करार करण्यात आला. या करारानुसार मुंबईतील ८१७ अंगणवाड्या आवश्यक सोयी-सुविधांनी सुसज्ज करून सक्षम करण्यासाठी काम केले जाणार आहे.

कार्यक्रमात आयुषच्या डॉ. शुभांगी ठाकूर यांनी बालकांचा मसाज व काळजी याबाबत सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. आरसीएचच्या डॉ. उपाली वाघमारे यांनी ‘ॲनिमिया’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास सेवेच्या रंगीत लोगोचे, वेबपेजचे आणि ‘पोषण आहार प्रार्थने’चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

उत्कृष्ट जिल्ह्यांचा गौरव
गेल्या वर्षीच्या ८व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्हा कार्यालयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. वर्धाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे व सहकारी, हिंगोलीचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विजय बोराटे आणि नागपूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कैलास घोडके यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वर्धा, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये मनिषा कुरसंगे, मुंबई जिल्हा कार्य अधिकारी प्रेमा घाडगे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, पर्यवेक्षक भाऊसाहेब बोरकर आणि नाशिकचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच ज्योती गायकवाड, शुभांगी लोहकर आणि कांता गायकवाड या अंगणवाडी सेविकांचाही योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रीशा धीवर, स्वामिनी कोलहाले आणि सुनिता मोगल या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभाच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात आले. लेक लाडकी योजनेचा लाभ आता डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!