Saturday, October 10, 2026

दुष्काळी परिस्थितीतील पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/सुखदेव फुलारी

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व्यवस्थापन आणि आगामी काळातील संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत टँकरद्वारे पाणीपुरवठा, पीक नुकसानीचे सर्वेक्षण, पीक विम्याशी संबंधित कार्यवाही आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेण्यात येत आहे. या उपाययोजनांची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केंद्रीय पथकासमोर सविस्तर सादरीकरणाद्वारे दिली.

खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे आंतरमंत्रालयीन पथक शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. पथकप्रमुख के. पोन्नुसामी (संचालक, केंद्रीय पीक विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आढावा बैठक झाली. पथकात अबसर अहमद खान (केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) आणि सुमीत शर्मा (सहायक संचालक, केंद्रीय अन्न विभाग) यांचा समावेश होता.

*जिल्ह्यात सरासरीच्या 66 टक्के पाऊस….*

प्रभारी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, हवामानातील बदल, अल निनोचा संभाव्य परिणाम आणि शेतीपिकांच्या नुकसानीची तांत्रिक माहिती सादर केली. जिल्ह्यात आतापर्यंत 299 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 66 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विशेषतः धरणांच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याचा परिणाम शेती आणि पाणी उपलब्धतेवर झाला आहे.
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात टंचाई आढावा बैठका घेतल्या असून, शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली असल्याची माहितीही श्री. हिंगे यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी तसेच शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचाही आढावा सादरीकरणात घेण्यात आला.
जिल्ह्यातील भंडारदरा धरण 100 टक्के, मुळा धरण 74 टक्के आणि निळवंडे धरण 80 टक्के भरले आहे. मात्र, धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असला तरी लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

*158 गावांना 164 टँकरद्वारे पाणीपुरवठा…*

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन सध्या 158 गावांना 164 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा, मागील वर्षाच्या तुलनेतील पाण्याची स्थिती आणि आगामी काळात टँकरची आवश्यकता भासू शकणाऱ्या गावांचा आढावा केंद्रीय पथकाला सादर करण्यात आला. पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार उपाययोजना करता याव्यात, यासाठी प्रस्तावित टँकरची गरज आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन यांची माहितीही बैठकीत देण्यात आली. टंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

*पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती सादर…*

कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी तालुकानिहाय पावसाची स्थिती, खरीप पिकांचे नुकसान आणि पीक पाहणी अहवाल यांची माहिती सादर केली. बहूवार्षिक फळपीकांचे होत असलेले अतोनात नुकसान, पीक विमा आणि नुकसानीशी संबंधित बाबींचाही आढावा घेण्यात आला. येत्या रब्बी हंगामात पिक निहाय पेरणीच्या क्षेत्रात येणारी घट देखील केंद्रीय पथकाचे निदर्शनास आणून देण्यात आली. जिल्ह्यात सूरू असलेल्या पिकांचे पंचनामा बाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला. प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे नुकसानीचे स्वरूप समजून घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

*जनावरांच्या चाऱ्यासाठीही नियोजन…*

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपायुक्त श्री. उमेश पाटील यांनी जिल्ह्यातील जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती आणि आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या गरजांची माहिती दिली. पावसातील तूट कायम राहिल्यास चाऱ्याच्या उपलब्धतेवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधनाच्या गरजा यांचा समन्वित विचार करून टंचाई व्यवस्थापनाचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

*कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याची सूचना…*

केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि आगामी काळातील नियोजनाची माहिती जाणून घेतली. भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसोबतच कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याची सूचनाही पथकाने केली.

बैठकीत कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे श्री. काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. बाळासाहेब शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती नरवडे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त श्री.उमेश पाटील, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. आराळकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती पवार, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता श्री. घोरपडे, श्री. बेडवाल आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!