शेवगाव/प्रतिनिधी
नदीला अंत्यत पवित्र समजून आपण तीला आपली माता मानले आहे. तरी सांडपाणी,प्लास्टिक, कचरा,निर्माल्य
टाकून आपण तीला अपवित्र करतो.नदीचे पावित्र्य जपले आणि तीला प्रवाहित ठेवले तरच मानवाच्या जीवनात समृद्धी येईल असे मत जलमित्र सुखदेव फुलारी यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज,शेवगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने वडूले येथे आयोजित नदी संवर्धन आणि स्वच्छता प्रकल्प एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळेत “नदी सनवर्धन काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन करताना जलमित्र सुखदेव फुलारी बोलत होते.
वडुले ग्रामपंचायतीचे सरपंच भीमराज सागडे यांचे प्रमुख उपस्थतीत व प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ युवराज सुडके, रासयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मिरे,प्रा. राम कोरडे, डॉ. अनिता आढाव, प्रा अश्विनी गोरखे, प्रा. मिनाक्षी चक्रे,राहुल कोळसे आदी उपस्थित होते.
श्री.फुलारी पुढे म्हणाले,नदी ही आपली जीवनदायनी आहे,तीच्या उगमापासून ते शेवटापर्यंत वेगवेगळी जैवविविधता आणि जीवनसाखळी निर्माण होत असते.
बारामाही वाहणारी नदी ३-४ महिनेही नीट वाहत नाहीत आणि हंगामी वाहणार्या नद्या त्या-त्या भागांतून गायब होताना दिसतात. नद्या आटण्याचे प्रमुख कारण म्हणजे नद्यांचे मूळ प्रवाह म्हणजे झरे कमी होणे.जमिनीच्या पोटात वेगवेगळ्या प्रकारचे दगड, खडक यांची रचना असते. या दगड खडकात त्यांच्या प्रकारानुसार छोटी-मोठी पोकळ जागा असते. पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा ते पाणी जमिनीवरील झाडे, झुडपे, गवत यांच्या मुळांच्या सोबत जमिनीत मुरते. पाणी जमिनीत मुरते म्हणजे जमिनी खालील या दगड-खडकांमध्ये असलेल्या पोकळ जागेत साठवले जाते. हेच पाणी झर्याच्या स्वरुपात बाहेर पडून नदीचा उगम होतो किंवा एखाद्या नदीला जाऊन मिळते आणि नदी-ओढे प्रवाहित होतात.
म्हणून मानवाने जल,जंगल आणि जमिन यांचे ही सरंक्षण-संवर्धन करण्याची गरज आहे. नदी-ओढे हे नैसर्गिक जलप्रवाह आहेत मात्र अतिक्रमणे व मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचे नैसर्गिक अस्तित्व नष्ट होत आहे. आपल्या घरातील जुने कपडे, निर्माल्य,रक्षा नदीत टाकण्याऐवजी अन्य विल्हेवाट लावावी. सांडपाणी गावातील नदीत,ओढ्यात सोडण्याऐवजी शोष खड्डे घेऊन जमिनीत जिरवावे किंवा एसटीपीचा वापर करून पाणी शेती-झाडांकरिता उपयोगात आणावे.
सरपंच भीमराज सागडे म्हणाले की,
पाण्याचे नदीचे महत्त्व काय असते याचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे हा या कार्यशाळेचा हेतू असावा. गावाच्या जवळच्या भागात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा नदीमध्ये टाकला जातो. पाऊस कमी कमी होत आहे,नद्या कोरड्या होऊन त्यात गटाराचे पाणी साचत आहे ही वस्तुस्थिती आहे. पाण्याशिवाय माणूस आणि प्राणी जगू शकत नाही अशा या विषयाकडे आपण निष्काळजीपणे बघत असतो. गंगा नदीपासून गावातील नदीपर्यंत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.जलस्रोत स्वच्छ असले पाहिजेत.
परंतु आपली मानसिकता अजून ही बदलत नाही,आपण अजूनही पवित्र नदीत घाण करत आहोत.
प्राचार्य डॉ.पुरूषोत्तम कुंदे म्हणाले की,
पाण्याचा एक थेंब सुद्धा खूप महत्त्वाचा झालेला आहे.तरीही पाण्याचे महत्व आपल्याला पाहिजे तितके समजलेले नाही. एकीकडे आई म्हणायचे आणि दुसरीकडे सर्व घाण नदीत टाकायची अशी आपली मानसिकता आहे. देशात शहरातून, गावातून वाहणारी एकही नदी नाही की जी स्वच्छ आहे. नैसर्गिक स्रोत टिकवणे ही आपल्या पुढे सर्वात मोठे आव्हान आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून नदीपर्यंत जा, स्वच्छता करा आणि लोकांपर्यंत संदेश द्या हा या कार्यशाळेचा हेतू आहे.
प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०० स्वयंसेवकांनी वडुले येथील नंदिनी नदी पुलाखाली श्रमदान करून नदी पात्रात टाकण्यात आलेल्या देव-देवतांच्या मूर्ती-प्रतिमा जमा करून एका जागी ठेवल्या, पत्रातील प्लास्टिक,जुनी कडपे,काट्या,कचरा एकत्र करुन जाळून टाकून नदी पात्राची स्वच्छता केली.
डॉ.संदीप मिरे यांनी प्रास्ताविक केले.
स्वयसेविका कु. राजेश्वरी सरोदे हिने
सूत्रसंचालन केले.प्रा. राम कोरडे यांनी
आभार मानले.