Thursday, April 23, 2026

साधू संतांचे विचार हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा-महंत भास्करगिरीजी महाराज

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

साधू संतांचे विचार हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भूलोकीतील स्वर्ग असलेले दत्तपीठ श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे प्रोफेसर डॉ.सुभाष शेकडे लिखित “संत चारधाम संत चरित्र ग्रंथांचे” प्रकाशन देवगड संस्थानचे मठाधिपती महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडले.त्यावेळी ते बोलत होते.
ह.भ.प. स्वामी प्रकाशानंदजी महाराज, ह.भ. प. कल्याण महाराज पवार , अण्णासाहेब सदाफळ,प्रा. डॉ.राजकुमार घुले, प्रोफेसर डॉ.सुभाष शेकडे , प्रा. डॉ. सुमित्रा घुले, देवगडचे सरपंच अजय साबळे,मेजर सतीश बडे तसेच इतर भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज पुढे म्हणाले की, संतांचे अध्यात्मिक विचार हे ईश्वरभक्ती, प्रेम, समानता आणि मानवतेवर आधारित आहेत. संत भगवान बाबा , संत वामनभाऊ यांनी अध्यात्माद्वारे सर्वांमध्ये परमेश्वर पाहणे, मानवी सेवा करणे, अज्ञानांना सज्ञान बनवणे व बहुजनांना अध्यात्माच्या मार्गाने घेऊन जाण्यातच खरा परमार्थ मानला. ज्ञानोबा-तुकोबांच्या लेखणीतून आणि विचारातून उतरलेला भक्तिमार्ग संत चारधाम या चरित्र ग्रंथातील सर्व संतांनी सर्वसामान्यांसाठी सोपा करून दिला. संतांनी अंधश्रद्धेच्या विचारांना फाटा देऊन सर्वांना बरोबर घेऊन अध्यात्म रंगात रंगवून सर्वसामान्यांना समतेचा संदेश दिला. संत वामनभाऊ-भगवानबाबांचे कार्य हे संत किसनगिरी बाबांच्या कार्याशी सुसंगत असे होते. त्यांचे एकमेकांशी अतूट असे आध्यात्मिक नाते होते. संत चारधाम या चरित्र ग्रंथातील संत भगवान बाबा, संत वामनभाऊ, संत नारायण महाराज, संत खंडोजी बाबा या चारही संतांच्या चरित्र वाचनाने चारधाम घडल्याचे पुण्य वाचकाच्या पदरात पडेल असा संदेश ह. भ. प. भास्करगिरी महाराज यांनी
दिला.

प्रा. डॉ.राजकुमार घुले यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.सुमित्रा घुले यांनी सूत्रसंचालन केले.आभार लेखक प्रोफेसर डॉ.सुभाष शेकडे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!