नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील देडगाव येथील तक्षशिला विद्यालयात ‘इग्नाइट फेस्ट’ बाल उद्यम उत्सव उत्साहात संपन्न झाला असून १०० स्टॉल्सच्या माध्यमातून दीड लाखांची उलाढाल झाली.
देडगाव येथील तक्षशिला विद्यालयाने विकसित उद्यम, विकसित राष्ट्र’ या संकल्पनेवर आधारीत बाल उद्यम उत्सवाचे आयोजन केले. सुप्रसिद्ध किर्तनकार ज्ञानेश्वर महाराज तांबे व हभप बाळासाहेब महाराज गडकर यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्शीभाऊ एडके, प्रख्यात कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज तांबे आणि ज्येष्ठ कीर्तनकार सुखदेव महाराज मुंगसे यांची विशेष उपस्थिती होती.
*बाळासाहेब महाराज गडकर…
शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नसून ती जीवन जगण्याची एक कला आहे. विद्यार्थ्यांना शालेय वयातच जर व्यवसायाचे आणि कष्टाचे महत्त्व समजले, तर ते भविष्यात यशस्वी उद्योजक बनून देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतील,” असे प्रतिपादन गडकर महाराज यांनी केले.
*ज्ञानेश्वर महाराज तांबे…
अध्यात्म व उद्योजकता यांची सांगड घातली तर विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असे मत तांबे महाराज याःनी व्यक्त केले.
*प्रा. डॉ. विजय कदम...
संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची आवड निर्माण व्हावी हाच या फेस्टचा मुख्य उद्देश आहे.
या उत्सवाचे मुख्य सूत्र ‘विकसित उद्यम, विकसित राष्ट्र’ हे होते. विद्यार्थ्यांनी केवळ वस्तूंची विक्री केली नाही, तर उत्पादनापासून ते मार्केटिंग आणि आर्थिक नियोजनापर्यंतचे सर्व धडे प्रत्यक्ष अनुभवातून घेतले.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ कशी मिळवून द्यावी, याचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजी बाजार भरवला होता. खाद्यपदार्थांपासून ते हस्तकला वस्तूंपर्यंत १०० हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले होते.
काही विद्यार्थ्यांनी स्वतः ‘गेम झोन’ तयार करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
*विक्रमी प्रतिसाद…
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कल्पकतेचे बाळासाहेब महाराज गडकर आणि इतर मान्यवरांनी विशेष कौतुक केले. संपूर्ण महोत्सवात विद्यार्थ्यांनी सुमारे दीड लाख रुपयांची विक्री केली, जी शालेय स्तरावर एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, उपप्राचार्य मयुरी आढाव, समन्वयक कल्पना पवार आणि संचालिका शुभांगी कदम यांनी परिश्रम घेतले. परिसरातील नागरिकांनी या बाल उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठी गर्दी केली.
या कार्यक्रम प्रसंगी ग्रामविकास आधिकारी दत्ताञय पवार , प्रगतशिल शेतकरी दत्ताञय शिंदे, कृषिअधिकारी संजय कदम ,ऍड पालवे, गणेश औटी, नवनाथ मुंगसे, डॉ भागवत वेताळ, पत्रकार युनूस पठाण, अविनाश तांबे, बापू म्हस्के आदी पालक मोठया संख्येने उपस्थित होते.


