नेवासा/प्रतिनिधी
ज्ञानेश्वर महाराजांनी विचारांचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचना स्थान असलेल्या पवित्र ठिकाणी साधं सरळ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. या पुस्तकात एका वाक्यातील विचार आकाशाला गवसणी घालणारे आहेत असे प्रतिपादन ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी केले.
सोमवार दि. ९ मार्च रोजी सकाळी ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश शिंदे लिखीत ‘साधं सरळ’ पुस्तकाचे प्रकाशन माऊली चरणी अर्पण करून करण्यात आले. त्यावेळी देविदास महाराज म्हस्के बोलत होते.ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
नेवाशाच्या माजी सभापती सुनिता गडाख,नागेबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे व्यासपीठावर होत्या.
महंत म्हस्के महाराज पुढे म्हणाले की, समाज माध्यमातून समाजासमोर चांगले विचार नेऊन, समाजातील हाताश, निराश झालेल्या माणसाला जीवन जगण्याचे बळ देऊ शकतात. अवघड काम कोणीच करत नाही सरळ सोपा मार्ग लोकांना आवडतो याचा उल्लेख पुस्तकात आहे. हे पुस्तक नवीन पिढीला दिशा देण्याचे काम करील.
अध्यक्षीय भाषणात पांडुरंग अभंग म्हणाले की, मी लिहलेल्या ‘शेतमळा ते विधानसभा’ आत्मचरित्राचे मुखपृष्ठ ज्ञानेश शिंदे यांचे आहे. शिंदे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील वाक्य काळजाला जाऊन भिडतात. आजची तरुण पिढी कोणेचेही ऐकायाला तयार नाहीत परंतू त्यांना हे पुस्तक उपयोगी पडेल.
सुनीताताई गडाख म्हणाल्या की, ज्ञानेश शिंदे यांचे साधं सरळ आहे म्हणून विचारांची प्रगती झाली. कडूभाऊंचे विचारधन सुंदर आहे. शिंदे यांचे पुस्तक शाळा,महाविद्यालय, देशात गेले पाहिजे त्यासाठी गडाख कुटुंबीयांकडून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास दिनेश व्यवहारे,स्नेहल भुजाडी, व्यंकटेश मल्टीस्टेटचे कृष्णा मसूरे,मच्छिंद्र व्यवहारे, संजय दळवी,अजित रसाळ, आबासाहेब काळे, नितीन केदारी, जालिंदर गवळी,योगेश रासणे, स्नेहालयच्या डाॅ.प्राजक्ता कुलकर्णी,डॉ. शिवाजी शिंदे, अड.काकासाहेब गायके आदिंसह नागेबाबा परिवारातील सदस्य, भाविक उपस्थित होते.
संतोष भामरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लेखक ज्ञानेश शिंदे यांनी पुस्तकाची माहिती दिली. संजय मनवेलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


